Pimpri : अशोक मोरे यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवड व्हावी; पर्यावरण विभागासह विविध स्तरांतून मागणी

Ashok More should be elected as Governor-appointed MLA; Demand from various levels including environment

एमपीसीन्यूज : पर्यावरण, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात अशोक मोरे यांनी मोलाचे योगदान दिले असून, राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांची निवड झाल्यास ते अधिक संयुक्तिक होईल, अशी अपेक्षा पर्यावरण विभागासह विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

दरम्यान, पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून भरीव कामगिरी करणाऱ्या अशोक मोरे यांची या पदासाठी निवड करावी, अशी मागणी काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी केली आहे.

मागील चार ते साडेचार दशके समाजकारणात कार्यरत असलेले मोरे हे 1978 पासून काँग्रेसचे क्रियाशील सदस्य आहेत. 2002 पासून पर्यावरण विभागाचा कार्यभार सांभाळणाऱ्या मोरे यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात मोलाचे काम केले आहे.

पर्यावरण संवर्धन, पर्यावरण रक्षणाचा जागर घडविण्याबरोबरच या क्षेत्रात प्रामाणिकपणे व झोकून काम करणाऱ्यांना सतत बळ व प्रोत्साहन दिले आहे.

पर्यावरण संवर्धन ही चळवळ व्हावी, या दृष्टीने ते या क्षेत्रात अविरत कार्यरत राहिले आहेत. याशिवाय शिक्षण, सांस्कृतिक यांसह वेगवेगळय़ा स्तरावरही त्यांनी आपले योगदान दिले आहे.

मूळचे कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहे येथील असलेल्या मोरे यांचा राज्यभर वावर असतो. रोहा-माणगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 1999 मध्ये निवडणूक लढविली होती.

तसेच महाराष्ट्र कृषक समाज, कोकण कृषी विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विविध स्तरांतून त्यांची या पदावर निवड व्हावी, अशी मागणी होत आहे.

पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे मोरे यांचा या पदाकरिता विचार झाल्यास पर्यावरणवादी व बुद्धीजीवी नागरिकांना पक्षाकडे येण्याच्या दृष्टीने चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

उपाध्यक्ष साहेबअली शेख, सचिव दिलीप पाटील, जिल्हाध्यक्ष प्रा. नरेश मोरे यांनीही अनेकांकरिता ते प्रेरणास्रोत असल्याचे नमूद केले आहे. विविध सामाजिक संस्थांनीही मोरे यांची निवड झाल्यास मागच्या अनेक वर्षांपासून निरलसपणे काम करणाऱया कार्यकर्त्याचा उचित सन्मान होईल, असे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.