Pimpri Corona News : रुग्णसंख्या घटली ! पाच ‘सीसीसी’ सेंटर, ‘जम्बो’त नवीन रुग्णांची भरती बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मागील पंधरा दिवसांपासून घट झाली आहे. रुग्णसंख्या पाचशेच्या आत आली असून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. रुग्णसंख्या घटल्याने महापालिकेने पाच कोविड केअर सेंटर (सीसीसी) बंद केले आहेत. तर, दोन दिवसांपासून नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे नवीन रुग्ण दाखल करून घेणे देखील बंद केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने पीएमआरडीएतर्फे पिंपरीतील नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे 816 बेडचे अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. 1 सप्टेंबर 2020 पासून हे जम्बो कोविड केअर सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी सुरु झाले होते.

दरम्यान, पहिली लाट ओसरल्यावर 1 जानेवारी 2021 पासून जम्बो सेंटर बंद केले होते. शहरात फेब्रुवारी 2021 पासून पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. त्यामुळे पुन्हा जम्बो कोविड केअर सेंटर सुरू केले. महापालिकेने मेड ब्रोज या संस्थेकडे जम्बोच्या संचलनाचे काम दिले आहे.

मे महिन्याच्या पंधरवड्यापासून शहरातील रुग्णसंख्येत घट होत आहे. रुग्णसंख्या पाचशेच्या आतमध्ये आली आहे. त्यामुळे जम्बो कोविड सेंटरमध्ये दोन दिवसांपासून नवीन रुग्ण भरती करून घेणे बंद केले आहे. सध्या जम्बोत 170 रुग्ण दाखल आहेत. तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी सुरू केलेली पाच कोविड केअर सेंटर देखील बंद करण्यात आली आहेत.

‘जम्बो’चे डॉ. संग्राम कपाले म्हणाले, “जम्बोत एकूण 800 बेड होते. तिथे वायसीएम रुग्णालयातून रेफर केलेल्या रुग्णांना दाखल करून घेतले जाते. थेट पद्धतीने रुग्णाला दाखल करून घेतले जात नाही. दोन दिवसांपासून नवीन रुग्ण भरती करणे बंद केले आहे. आता 170 रुग्ण उपचार घेत आहेत”.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, “शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. महापालिकेचे नवीन आकुर्डी आणि थेरगाव रुग्णालय लवकरच सुरू केले जाणार आहे. त्यामुळे जम्बोत नवीन रुग्ण भरती करणे बंद केले असून जेवढे रुग्ण आहेत त्यांच्यावर व्यवस्थित उपचार केले जात आहेत. हे सगळे रुग्ण बरे झाल्यानंतर परिस्थिती पाहून जम्बो बंद करण्याबाबत आयुक्त निर्णय घेतील.

शहरातील पाच कोविड केअर सेंटर बंद केले आहेत. घरकुलमधील चार आणि मोशीतील ट्रायबल हॉस्टेलमधील एक अशी पाच सीसीसी सेंटर बंद केले आहेत. रुग्णसंख्या घटत असल्याने सीसीसी सेंटर टप्प्याटप्प्याने बंद करत आहोत. घरकुलमधील काही, बालेवाडीतील एक सीसीसी सेंटर चालू ठेवण्याचे नियोजन आहे.

भविष्यात रुग्णसंख्या वाढल्यास दोन दिवसांची नोटीस देऊन सीसीसी सेंटर चालू करता येतील. यंत्रणा सर्व उपलब्ध आहे. साफसफाई करून तत्काळ सीसीसी सेंटर चालू करता येणार आहेत”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.