Pimpri corona News: नवीन कोरोना ! हवाई प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण

वाकडमधील जिंजर, सयाजी हॉटेलमध्ये रहावे लागणार स्व:खर्चाने विलगीकरणात

नवीन विषाणूच्या रुग्णाला भोसरीतील रुग्णालयात ठेवणार

एमपीसी न्यूज – ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना विषाणूचा शहरात प्रसार होवू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. ‘युके’हून येणा-या सर्व हवाई प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. त्यांना वाकडमधील जिंजर, सयाजी हॉटेलमध्ये स्व:खर्चाने सात दिवसांसाठी विलगीकरणात रहावे लागणार आहे. हवाई प्रवाशांना शोधण्यासाठी कार्यकारी अभियंता सतिश इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन विषाणूच्या पॉझिटीव्ह रुग्णांना भोसरीतील नवीन रुग्णालयात स्वतंत्र ठेवण्यात येणार आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणुची घातकता पुढील काही दिवसात कळेल. त्यामुळे आजपासून महानगरांमध्ये रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत नाईट कर्फ्यु (संचारबंदी) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत तो लागू राहील.

नवीन कोरोना विषाणूचा शहरात प्रसार होवू नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

महापालिका करत असलेल्या उपाय योजनांची माहिती अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली. ‘युके’हून येणा-या सर्व हवाई प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. वाकडमधील जिंजर, सयाजी हॉटेलमध्ये स्व:खर्चाने त्यांना सात दिवसांसाठी विलगीकरणात रहावे लागणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

या प्रवाशांमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यास पुढील उपचारासाठी थेट भोसरीतील रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. जुन्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये नवीन विषाणूच्या रुग्णांना ठेवले जाणार नाही. त्यासाठी भोसरीतील जुन्या कोरोनाच्या 18 रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात येणार आहे.

प्रवाशांचे आगमान झाल्या-झाल्या त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार नाही. पाचव्या ते सातव्या दिवसादरम्यान विलगीकरण केलेल्या प्रवाशांना स्व:खर्चाने आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी लागेल. चाचणी निगेटीव्ह आढळल्यास प्रवाशाला पाच ते सात दिवसांनी संस्थात्मक विलगीकरण कक्षातून सोडण्यात येईल.

या प्रवाशास सात दिवसांचे अनिवार्य होम क्वारंटईन असेल. आरटीपीसीआरचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. परंतु, लक्षणे नसल्यास त्याच हॉटेलमध्ये विलगीकरण करण्यात येईल. त्याचा कालावधी 14 दिवसांपर्यंत असेल. हॉटेलच्या शुल्कानुसार प्रवाशांना शुल्क आकारण्यात येईल.

‘युके’हून येणा-या सर्व प्रवाशांची वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएल मार्फत करण्यात येईल. सर्व प्रवाशांचे पासपोर्ट जमा केले जातील. विलगीकरण संपल्यानंतर ते परत केले जाणार आहेत. प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी खासगी प्रयोगशाळांमार्फत करण्यात येईल. त्याबाबतचे शुल्क प्रवाशांकडून वसूल केले जाणार आहे.

‘युके’हून येणा-या सर्व प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासाची योजना विचारात न घेता हे नियम लागू राहणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेशात स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.