Pimpri : सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर यांना निलंबित करण्याची मागणी

नवभारतीय शिववाहतूक संघटनेची परिवहन आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड येथील परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सुबोध मेडशीकर यांना निलंबित करण्याची मागणी नवभारतीय शिववाहतूक संघटनेकडून करण्यात आली आहे. मेडशीकर यांचे खात्यातील वर्तन बेजबाबदार आहे. तसेच कार्यालयातील महिलांमध्ये त्यांच्यामुळे असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले असल्याचा आरोप संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय घुले यांनी केला आहे.

दत्तात्रय घुले यांनी नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या वतीने परिवहन आयुक्तांना याबाबत निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर यांच्या वागणुकीमुळे परिवहन खाते बदनाम होत आहे. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे कार्यालयात काम करणा-या महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. एमएच 12 / सीपी 8712 क्रमांकाचा टेम्पो मालकाच्या परवानगीशिवाय मेडशीकर यांनी दुस-या व्यक्तीच्या नावावर केला आहे. हे एक प्रकरण समोर आले असून अजून काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे.

ऑटो रिक्षाच्या परवाना वाटपामध्ये देखील मोठा घोटाळा झाला आहे. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करता हजारो परवान्यांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे परिवहन विभागाची पारदर्शकता धुळीस मिळत आहे. त्यामुळे मेडशीकर यांना निलंबित करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.