Pimpri : रोजगार भरती मेळावा कंपनी व उमेदवारांसाठी उपयुक्त – एन. एन. वडोदे

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने (Pimpri) सुरू केलेल्या भरती मेळाव्यामुळे एकाच छताखाली कंपन्यांना कुशल मनुष्यबळ आणि बेरोजगारांना नोकरीची संधी प्राप्त होते. कंपनी व रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी हा भरती मेळावा उपयुक्त आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे, असे प्रतिपादन बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगचे (पश्चिम महाराष्ट्र विभाग) मुंबईचे उपसंचालक एन. एन. वडोदे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओई) तसेच भारत सरकारच्या मानव संसाधन विभागा अंतर्गत बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (बोट), वेस्टन रिजन, मुंबई, इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग ॲण्ड एअर कंडिशनिंग इंजिनिअर (इश्रे) कॉन्फीडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय), टीएसविके आणि महाराष्ट्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स असोसिएशनचे (एमएटीपीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि. 10 जानेवारी) आयोजित केलेल्या अप्रेंटिस भरती मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी वडोदे बोलत होते.

यावेळी प्रिती वर्मा (पॉलीबॉण्ड इंडिया), अरुण चिंचोले (इश्रे), फैसल (उपाध्यक्ष, एमएटीपीओ मुंबई), पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीईटी प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रिती वर्मा म्हणाल्या, कंपनीमध्ये अप्रेंटिसचे काम करताना अनेक बाबी शिकण्यास मिळतात. तसेच, उमेदवारांना शिक्षणाबरोबरच आर्थिक मदतही होते. कंपनी आणि बोट यांच्याकडून दोन प्रमाणपत्रही दिले जातात. रोजगार मेळाव्यातून गरजेनुसार उमेदवारांना चांगल्या कंपनीत काम करण्याची संधी मिळते.

Pimpri News: साडेबारा टक्के परताव्याच्या निर्णयाचा अध्यादेश तत्काळ निघावा; भूमिपुत्रांची अपेक्षा

या रोजगार मेळाव्यात टाटा मोटर्स, बजाज ऑटो, जॉन डीअर इंडिया, बॉश, फोर्ब्स मार्शल, ॲटलास कॉपको, टीव्हीएस, मित्सुबिशी इलेक्ट्रिक, किर्लोस्कर, महिंद्रा सीआयइ, केएसबी लिमिटेड, कल्याणी टेक्नोफोर्ज, जयहिंद इंडस्ट्रीज, टाटा ऑटोकॉम, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, डाना इंडिया, आयटीसी लिमिटेड, ब्रिटानिया, एसकेएफ, जबील, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि अन्य नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

अप्रेंटिस भरती मेळावा यशस्वी होण्यासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्‌माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, पीसीसोओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या भरती मेळाव्यामध्ये डिप्लोमा इंजीनियरिंग, इंजीनियरिंग डिग्री, बीएससी, बीसीएस पदवीधर उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध झाल्या.

स्वागत प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी, प्रास्ताविक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचालन वैष्णवी मानखैर तर तन्मयी पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन विजय टोपे, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. अजित शिंदे, प्रा. संतोष शिंदे, प्रा. स्वप्निल सोनकांबळे, मंगेश काळभोर, पीसीईटीच्या शैक्षणिक संकुलातील विविध विद्याशाखांचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.