Pimpri: अजितदादांची मुलासाठी मतांची जुळवाजुळव; काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांची घेतली भेट

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातून मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुत्र पार्थ यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव सुरु केली आहे. त्यानुसार काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या निवासस्थानी जाऊन आज (शनिवारी) त्यांची भेट घेतली. तसेच आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करण्याचे आणि उद्याच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

पार्थ यांच्यासाठी शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यानंतर शुक्रवारी पार्थ यांची पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षाने प्रचाराची तयारी सुरु केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या (रविवारी) मावळ मतदारसंघातील प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री सुनील तटकरे, शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा, विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील मेळाव्याला उपस्थित असणार आहेत.

  • घरातील उमेदवार असल्याने पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे स्वत: शरद पवार हे नातवासाठी तर अजित पवार पुत्राच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांनी आज काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या पिंपळेनिलख येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

यावेळी अजित पवार म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेसचे काम चांगले आहे. दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी मिळून काम करावे. हुकुमशाही आणि जातीयवादी सरकारविरोधात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लढा देत आहेत. त्यांना आपल्याला साथ देऊन लढा यशस्वी करायचा आहे. मावळातून आघाडीचा उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करावेत. उद्या प्रचाराचा नारळ फोडायचा आहे. सभेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे”.

  • सचिन साठे म्हणाले, ”काँग्रेस पक्षाचा आघाडीचा निर्णय आम्हाला मान्य असून त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत. त्यामुळे आम्ही आघाडीच्या उमेदवाराचे मनापासून काम करणार आहोत. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी एवढीच आमची माफक अपेक्षा आहे”. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक मयुर कलाटे, राजू मिसाळ, जगदिश शेट्टी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.