Pimpri News: पुणे महानगर नियोजन समिती निवडणुकीचा महापालिका पदाधिकाऱ्यांना त्रास, दिवसभर दालनात जाताही आले नाही  

एमपीसी न्यूज –  पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीचा पिंपरी-चिंचवडच्या महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्यांना त्रास सहन करावा लागला. तिस-या मजल्यावर मतदान केंद्र असल्याने तिथे कोणालाही फिरकू दिले नाही. त्यामुळे पदाधिका-यांना दिवसभर आपला दालनातही जाता आले नाही. पार्किंगमध्ये थांबावे लागले. तर, आमदार, काही पदाधिका-यांनी दुस-या मजल्यावरील जैव विविधता समिती सभापतींच्या दालनाचा  आसरा घेतला.

पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी आज (बुधवारी) मतदान पार पडले. सकाळी 10 ते 5 या वेळेत मतदान झाले.  मोठे नागरी मतदार संघ (पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका) या गटासाठी मतदान झाले. पिंपरी महापालिकेतील भाजपचे 7 आणि राष्ट्रवादीचे 3 असे 10 नगरसेवक निवडणूक रिंगणात आहेत. महापालिकेत 124 नगरसेवक आहेत. त्यांना मतदान करण्यासाठी महापालिका मुख्यालयातील तळमजल्यावरील निवडणूक विभागात आणि तिस-या मजल्यावरील कै. मधुकर पवळे सभागृहात मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती.

महापालिकेच्या तिस-या मजल्यावर पदाधिका-यांची दालने आहेत. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते यांच्यासह विषय समितींच्या सभापतींचीही दालने आहेत. पण, तिस-या मजल्यावर मतदान केंद्र असल्याने तिथे दिवसभर कोणाला जाऊ दिले नाही. त्यामुळे पदाधिका-यांना दिवसभर आपला दालनात जाता आले नाही.

नगरसेवकांनाही तिस-या मजल्यावर थांबता आले नाही. काही पदाधिकारी, नगरसेवक पार्किंगमध्ये तर काही नगरसेवक दुस-या मजल्यावरील पॅसेजमध्ये थांबले होते. आमदार, काही पदाधिकारी यांनी दुस-या मजल्यावरील  जैव विविधता समिती सभापतींच्या दालनाचा आसरा घेतला. पत्रकारांनाही दिवसभर तिस-या मजल्यावरील पत्रकार कक्षात जाता आले नाही. त्यांनाही ताटकळत थांबावे लागले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.