Pimpri News : नागरिकांनो, महापालिकेकडून मिळालेले घर विकू नका : महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – झोपडपट्टीवासीयांचे घराचे स्वप्न साकार होत आहे. या घराचा वापर योग्य प्रकारे करून आपले राहणीमान उंचवावे. तसेच दिलेली सदनिका स्वच्छ व सुंदर ठेऊन ती विकू नये, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड -लिंकरोड येथील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसन प्रकल्पातील सदनिकांची संगणकीय सोडत आज (बुधवारी) चिंचवड येथे झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागात त्यांच्या हस्ते घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

नगरसेविका जयश्री गावडे, नगरसेवक शितल शिंदे, शैलेश मोरे, माजी नगरसेवक जगन्नाथ साबळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप, सामाजिक कार्यकर्ते दीपक मेवानी, प्रताप खैरारीया, सुंदर कांबळे आदी उपस्थित होते.

या प्रकल्पात 5 इमारती उभारण्यात आलेल्या आहे. त्यापैकी 2 इमारतीसाठी पात्र झालेल्या लाभार्थ्यांची संगणकीय सोडत काढण्यात आली. एका इमारतीमध्ये 112 सदनिका असून एका सदनिकेचे क्षेत्रफळ 269 चौरस फुट इतके आहे. त्यापैकी एक सदनिका अंगणवाडीकरिता राखीव ठेवण्यात आली आहे.

तसेच दिव्यांगासाठी शासकीय नियमानुसार आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. यासाठी लाभार्थ्याकडून स्वत:चा हिस्सा 42 हजार 570 रुपये मागासवर्गीयांसाठी व 50 हजार 575 खुला वर्गासाठी असून ज्यांची नावे पात्र लाभार्थ्यांमध्ये आहेत. त्यांच्याकडून हा स्व:हिस्सा भरून घेऊन त्यांना सदनिकेचे वाटप करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.