Pimpri News : घरात नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील बालक आहे ! मग त्यांना ‘अ’ जीवनसत्वाचा डोस द्या

पिंपरी-चिंचवड वैद्यकीय विभागाचे आवाहन

एमपीसी न्यूज – बालकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच शारीरिक विकास आणि तंदुरुस्तीसाठी ‘अ’ जीवनसत्व महत्वाचे आहे. जर आपल्या घरी नऊ महिने ते पाच वर्ष या वयोगटातील बालक असेल, तर त्यांना अ जीवनसत्वाचा डोस द्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

शरीरामध्ये अ जीवनसत्वाची कमतरता असल्यास बालक वारंवार आजारी पडण्याची शक्यता असते. जंतू संसर्ग होऊन गोवर, अतिसार असे आजार होण्याची शक्यता जास्त असते.

यासाठी नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना अ जीवनसत्वाचा डोस देणे आवश्यक आहे.

ज्या बालकांना अ जीवनसत्वाचा डोस त्यांच्या वेळापत्रकानुसार मिळाला नाही, अशा बालकांसाठी वैद्यकीय विभागाने 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2020 या कालावधीत महापालिकेच्या रुग्णालय आणि दवाखान्यांमध्ये तसेच रुग्णालय आणि दवाखान्यांतर्गत आयोजित करण्यात येणा-या बाह्य नियमित लसीकरण सत्रात अ जीवनसत्वाचा डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ज्या घरात नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील बालक आहेत. त्यांना नजीकच्या महापालिका रुग्णालय, दवाखान्यात नेऊन गुरुवारी (दि. 27) अ जीवनसत्वाचा डोस द्यावा, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.