Pimpri news: परवानगी तीन वृक्षांची, तोडले सहा वृक्ष ; महापालिका गुन्हा दाखल करणार

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या उद्यान विभागाने तीन झाडे तोडण्याची आणि दोन झाडांचा विस्तार कमी करण्याची परवानगी दिली होती. मात्र, जागा मालकाने त्याऐवजी पाच ते सहा झाडे तळापासून तोडली आहेत. त्यामुळे महापालिका जागा मालकावर गुन्हा दाखल करणार असून झाडे तोडलेल्या लाकडाचा ट्रक भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध वृक्षतोड थांबता थांबेना झाली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे बेकायदेशीरपणे वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून सातत्याने केला जातो. महापालिकेकडून परवानगी घेतली जाते काही झाडे तोडण्याची प्रत्यक्षात मात्र अनेक मोठ्या झाडांची कत्तल केली जाते.

नेहरूनगर येथील महापालिकेच्या गुलाबपुष्प उद्यानाच्या बाजूला असलेल्या प्लॉटवरील मोठ्या झाडांची आज (शनिवारी) कत्तल करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाचे कार्यालय नेहरूनगर येथे आहे. तिथेच पालिकेचे गुलाबपुष्प उद्यान आहे. उद्यानाच्या बाजूला एक प्लॉट आहे. प्लॉटवर बाभळ, इंग्रजी चिंच, पिचकारी, करंज अशी मोठी झाडे होती. ती झाडे आज तोडण्यात आली.

महापालिकेने तीन झाडे तोडण्याची आणि दोन झाडांचा विस्तार कमी करण्याची परवानगी दिली होती. त्याऐवजी जागा मालकाने पाच ते सहा झाडे तळापासून कापली आहेत. यावर वृक्षप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

वृक्षप्रेमी प्रशांत राऊळ म्हणाले, गुलाबपुष्प उद्यानाशेजारी एक प्लॉट आहे. तिथे मोठ मोठी झाडे आहेत. महापालिकेने झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. पाहणी अहवाल 6 एप्रिलचा असून आज झाडे तोडण्यात आली. वृक्ष प्राधिकरण समितीची मान्यता घेतली होती का?, तिथे भराव टाकला आहे. झाडे तोडूनच हा भराव टाकण्यात आला आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

झाडांचा ट्रक पोलीस ठाण्यात नेला; गुन्हा दाखल करणार – इंगळे

उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे म्हणाले, “तीन झाडे तोडण्याची आणि दोन झाडांचा विस्तार कमी करण्याची परवानगी दिली होती. त्याऐवजी पाच ते सहा झाडे तळापासून कापली आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. लाकडाचा ट्रक आणि मालकाला घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेऊन चाललो आहोत. प्लॉट भरण्यासाठी राडारोडा आणून टाकला आहे. जागेचे सपाटीकरण केले जात आहे. शेड टाकले असून खानावळ देखील बेकायदेशीरपणे चालू केली आहे. झाडांचे फोटो काढले असून पंचनाला केला जाईल. ट्रक पोलिसांच्या ताब्यात दिला जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.