Pimpri : साडेअकरा तासानंतर पिंपरीमधील विसर्जन मिरवणुकीची समाप्ती

ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप ; एकूण ६१ मंडळांचा सहभाग

एमपीसी न्यूज – ढोल-ताशांचा खणखणाट, फुलांची आणि भंडाऱ्याची केली जाणारी मुक्त उधळण, झांज पथकाचे रंगलेले खेळ, तरुणाईचा शिगेला पोचलेला उत्साह अशा जल्लोषमय वातावरणात पिंपरी परिसरातील गणेश मंडळांनी रविवारी (ता. 24) बाप्पाला निरोप दिला. दुपारी साडेबारा वाजता सुरु झालेली गणेश विसर्जन मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यंत चालली. तब्बल साडेअकरा तास चाललेल्या मिरवणुकीत 61 गणेश मंडळांनी ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन केले.

बाप्पाला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच मंडळांची लगबग सुरू होती. गणेश मंडळांनी ‘श्रीं’च्या रथाला आकर्षक सजावट केली होती. दुपारी साडेबारा वाजता जी. के. एन. सटर्ड कंपनी मित्र मंडळाने मिरवणुकीत सर्वप्रथम सहभाग घेतला. रात्री नऊपर्यंत 33 मंडळांनी गणरायाला निरोप दिला. त्यामध्ये कैलास मित्र मंडळ, सदानंद तरुण मंडळ, शिवशंकर मंडळ, विकास तरुण मंडळ, प्रेमप्रकाश मंडळ, संग्राम मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, सुपर मित्र मंडळ आदींचा समावेश होता.

महानगरपालिकेतर्फे संत गाडगे महाराज चौक (कराची चौक) येथील स्वागतकक्षातून मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. महापौर राहुल जाधव, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे अग्निशामक अधिकारी किरण गावडे, ग प्रभाग प्रशासन अधिकारी राजेश जगताप, ज्ञानश्वर भरेकर, दीपचंद भाट, अभिजीत साबळे, प्रसाद खरात, पलाश देवकर,विठ्ठल गायकवाड आदी उपस्थित होते.

बाल ताशावादकाची धमाल

पिंपरी येथील नवचैतन्य तरुण मंडळाच्या ‘श्रीं’च्या मिरवणुकीत साडेसात वर्षांचा ताशा वादक सोहम सालपेकर व योगद्रुम माने याने धमाल उडवून दिली. त्याने अतिशय उत्तम ताशा वादन करून आपल्या कलेचे अनोखे दर्शन घडविले. कृत्रिम फुलांची आकर्षक सजावट केलेल्या रथात ‘श्रीं’ची मिरवणूक निघाली. मातृभूमी ढोल ताशा पथकाने रंगतदार खेळ सादर केले.

ढोल-ताशा आणि सनईवादन

पिंपरी येथील श्री लालबहादूर शास्त्री भाजी मंडई व्यापारी संघटनेच्या ‘श्रीं’च्या मिरवणुकीत रंगतदार ढोल-ताशावादन आणि बरची नृत्य सादर केले. मुख्य विसर्जन मिरवणुकीत रात्री आठ वाजता संघटनेची ‘श्रीं’ची मिरवणूक सहभागी झाली. त्रिवेणी संगम सनई सूर संगीत वाद्य पार्टीने (जि. सोलापूर) केलेल्या सनईवादनाने अवघे वातावरण मंत्रमुग्ध झाले. केंगार महाराज यांनी डोक्‍यावर समई आणि त्यावर पाण्याने भरलेली कळशी घेऊन अचंबित करणारे नृत्य केले. मंडळाच्या गणरायाला आकर्षक फुलांची सजावट होती.

फुलांची मुक्त उधळण

पिंपरी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांनी फुलांची मुक्त उधळण आणि फटाक्‍यांची आतषबाजी केली. शिवराजे प्रतिष्ठानने फुलांची उधळण केली. शिवाजी महाराजांची वेषभूषा लक्ष वेधून घेत होती. विठ्ठल तरुण मंडळाच्या ढोल लेझीम संघाने खेळ सादर केले. मोरे पुष्प भंडार मंडळाने ‘श्रीं’च्या रथाला आकर्षक फुलांची सजावट केली; तसेच फुलांची उधळण केली. अष्टविनायक मित्र मंडळाच्या महिलांनी फुगड्यांचा फेर धरला. शिवशक्ती तरुण मित्र मंडळाच्या ‘श्रीं’च्या मिरवणुकीत युवतींनी नृत्य केले. फेटे घालून तरुण-तरुणी सहभागी झाल्या.

पोलिसमित्र, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा सहभाग, आदी कामांसाठी स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला. भाविकांकडून मिरवणुकीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले जात होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.