Pune : पावसामुळे विसर्जना दिवशी शहरातील रस्ते देखील गेले पाण्यात

एमपीसी न्यूज – एकीकडे सर्वजण बाप्पांना निरोप देत असताना पावसाने मात्र (Pune) जोरदार हजेरी लावल्याने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. यामुळे काही सखल भागात पाणी साठून घरांमध्ये देखील पाणी गेले होते. कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, धायरी, वारजे, माळवाडी, सूस, बावधन यासह इतर भागात दाणादाण उडाली. कोथरूड येथे प्रतिज्ञा मंगल कार्यालय या भागात अनेक सोसायट्या, बंगल्यांच्या आवारात पाणी घुसले. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने गोंधळ उडाला.
Maval : गणपती विसर्जन करताना एकजण पवना नदीत बुडाला
गुरुवारी सायंकाळी शहरात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने काही भागात पाणी साचले होते. कोथरूड येथील प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळही पाणी साचले असून या परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये ही पाणी साचले होते.
काही दुकानात पाणी शिरल्याने दुकानदार दुकानातून पाणी काढत होते. अग्निशमन दलाचे अधिकारी देखील काही वेळाने घटनास्थळी दाखल झाले. पीएमसीच्या ड्रेनेज विभागाचे अधिकारीही मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले.
सिंहगड रस्त्यावर पाणी साठल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे टिळक चौकात मानाच्या गणपतीचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.
मात्र, या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तेथून काढता पाय घेत थेट अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. मात्र यावेळी शहरात योग्य पद्धतीने चेंबरची (Pune) स्वच्छता झाली नाही अशी तक्रार नागरिकांनी यावेळी प्रशासनाजवळ केली.
भारतीय हवामानशास्त्र (IMD) ने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, बारामती जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 59.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर आंबेगावमध्ये 46 मिमी पावसाची नोंद झाली आहे.तसेच राजगुरुनगर येथे 29.5 मिमी, धामढेरे 27 मिमी, एनडीए 26.5, खेड 25 आणि दौंड येथे गेल्या 24 तासांत 20 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या 12 तासांत शहर परिसरात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. आयएमडीनुसार, गेल्या 12 तासांत वडगाव शेरी येथे 26.2 मिमी, कोरेगाव पार्कमध्ये 23.4 मिमी, मगरपट्टा 23.4 मिमी, हडपसर 22.9 मिमी, तर शिवाजीनगर येथे 21.1 मिमी पावसाची नोंद (Pune) झाली आहे.