Chinchwad: चिंचवडमध्ये जल्लोषात बाप्पाला निरोप, दहा तास विसर्जन मिरवणूक

फुले आणि भंडा-याची उधळण; शांततेत विसर्जन मिरवणूक

एमपीसी न्यूज – ढोल-ताशांचा दणदणाट…आकर्षक रोषणाई… सजवलेल्या रथांची रेलचेल… गणपती बाप्पा मोरयाचा अखंड जयघोष.. एक दोन तीन चार, गणपतीचा जय जयकार”, ‘गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या’… अशा जयघोषात आणि भंडा-याची, फुलांची मनसोक्त उधळण करत उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात गणरायाला रविवारी निरोप देण्यात आला. वाढती महागाई, ‘बेटी बेटी बचाव, बेटी पढाव, ‘पाणी वाचवा, पर्यावरण वाचवाचा संदेश’ विविध मंडळांनी दिला. तब्बल दहा तास चाललेली विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

दुपारी दोन वाजता सुरूवात झालेली मिरवणूक रात्री बारा वाजता म्हणजे दहा तास चालली. रात्रीबारापर्यंत 36 मंडळांनी विसर्जन केले. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. चिंचवड, चापेकर चौकात पोलिसांच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, सभागृह नेते एकनाथ पवार, अतिरीक्त आयुक्त दिलीप गावडे, नगरसेविका अर्पणा डोके, अश्विनी चिंचवडे, करुणा चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, अमित गोरखे यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले.

चिंचवड गावठाणातील मोरया मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक दोन वाजता विसर्जन घाटाकडे रवाना झाली. सायंकाळी आठपर्यंत सहा गणेश मंडळाच्या मिरवणूका घाटाकडे रवाना झाल्या होत्या. त्यानंतर पावणे नऊच्या सुमारास श्री दत्त मित्र मंडळाची मिरवणूक चौकात दाखल झाली. मिरवणुकीत जय मल्हार पथक सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी मनसोक्त फुलांची उधळण केली. दळवीनगर येथील समर्थ कॉलनी मित्र मंडळाची मिरवणुक आली. क्रांतीवीर भगतसिंह मित्र मंडळाचे बाप्पा पालखीतुन दाखल झाले. महिलांनी पालखी खांद्यावर घेतली होती. आकर्षक शिव रथातून चिंचवडचा राजा
श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाची मिरवणूक आली. अग्नितांडव ढोल-ताशा पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले.

चिंचवड गावठाणीतल श्री काळभैरवनाथ मित्र मंडळाने वाढत्या महागाईकडे लक्ष वेधत ‘भस्मासुर’ वधाचा देखावा सादर केला. गॅस आणि पेट्रोल पंपाची प्रतिकृती ठेवत गॅस दर एक हजार रुपये, पेट्रोल शतकाच्या उंबरठ्यावर, ..एका दुचाकीवर चार जण बसलेले चित्र दाखवत ‘साहेब तुम्ही सांगा दंड किती भरायचा…चौघांच्या बाईकमध्ये पेट्रोल भरण्यापेक्ष दंड परवडेल, वैद्यकीय सेवा महाग असा मजकूर लिहिला होता. ज्ञान प्रबोधिनी ढोल-ताशा पथकाने उत्कृष्ट वाद्य सादर केले.

ओम साई मित्र मंडळ भंडा-याची उधळण करत दाखल झाले. जय गुरू दत्त मित्र मंडळाचे बाप्पा आकर्षक पुष्परथात विराजमान झाले होते. उत्कृष्ट तरुण मित्र मंडळाने आकर्षक ‘गजरथ’ साकारला होता. स्वामी समर्थांची 25 फुटी भव्य मूर्ती. त्यावर फुलांची उधळण करत मिरवणूक विसर्जन घाटाकडे रवाना झाली. ज्ञानदीप मित्र मंडळाने आकर्षक असा ‘ध्वजरथ’ तयार केला होता. तसेच मंडळाची भारत मातेची मूर्ती लक्ष वेधून घेत होती. श्री शिवाजी उदय मित्र मंडळने ‘राजहंस’ रथ साकारला होता. आदर्श तरुण मंडळाने पाणी वाचवा, पर्यावरण वाचवाचा संदेश दिला. कापडी पिशव्या वापरण्याची जनजागृती केली.

गावडे कॉलनी मित्र मंडळाने आकर्षक असा ‘मयूररथ’ साकारला होता. एम्पायर एस्टेट मंडळाच्या हलगी वादन पथकाने सर्वांची मने जिंकली. गांधीपेठ तालीम मित्र मंडळाचे गणराज त्रिमूर्तीरथात आरूढ झाले होते. मुंजोबा मित्र मंडळाने फुलांची आरास केली होती. लक्ष्मीनगर सार्वजनिक मित्रमंडळाने आकर्षक असा ‘मयूररथ’ साकारला होता. भोईर कॉलनी मित्र मंडळाने लेझर शो केला होता. सुदर्शन मित्र मंडळाचे मुलींचे गणनाद वाद्य पथक होते. समता तरुण मित्र मंडळाने ‘गजरथ’ सादर केला होता. लेझीम आणि ढोल व ताशा पथकाने उत्कृष्ट वाद्य सादर केले. तसेच ‘बेटी बचाव, बेटी पढाव’च्या घोषणा दिल्या.

श्री छत्रपती शाहू तरुण मंडळाचे बाप्पा श्रीराम रथात विराजमान झाले होते. काळभोर नगर येथील श्री हनुमान मित्र मंडळाची मिरवणूक झाली. समाधान तरुण मंडळाचे 12 वाजता आगमन झाले. 12 नंतर शिवगर्जना मित्र मंडळ आणि त्यानंतर आलेल्या राणा प्रताप मित्र मंडळाने ‘मयूररथ’ साकारला होता.

विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणतही अनुचित प्रकार घडला नाही. घाटावर आणि विसर्जन मार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.