Pimpri: महापालिकेच्या कार्यक्रमात ‘प्रोटोकॉल’चे उल्लंघन – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून महापालिकेच्या कार्यक्रमात ‘प्रोटोकॉल’ पाळला जात नाही. निमंत्रण पत्रिकेवर अगोदर खासदार, त्यानंतर आमदाराचे नाव प्रोटोकॉलनुसार असते. परंतु, भाजपच्या राजवटीत त्यांचे उल्लंघन केले जात असून खासदाराच्या अगोदर आमदाराचे नाव टाकले जाते. प्रोटोकॉल पाळला जात नसल्याने कार्यक्रम महापालिकेचा नव्हे तर भाजपचा वाटतो. त्यामुळे मी महापालिकेच्या कार्यक्रमाला जात नाही, असे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

महापालिकेच्या विविध विकास कामांच्या उद्‌घाटनाला येत नसल्याबाबत विचारले असता खासदार बारणे म्हणाले,  महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून ‘प्रोटोकॉल’ पाळला जात नाही. त्याचे उल्लंघन केले जाते. निमंत्रण पत्रिकेवर खासदाराच्या अगोदर आमदाराचे नाव टाकले जाते. ‘प्रोटोकॉल’नुसार अगोदर खासदाराचे नाव असते. त्यानंतर आमदाराचे नाव असते.

प्रोटोकॉल पाळता जात नसल्याने कार्यक्रम महापालिकेचा नव्हे तर भाजपचा वाटतो. त्यामुळे मी महापालिकेच्या कार्यक्रमाला जात नाही. पोलीस आयुक्तालयाच्या उद्‌घाटनाच्यावेळी ‘प्रोटोकॉल’ पाळला होता. खासदारांचे अगोदर आणि त्यानंतर आमदारांचे नाव टाकले होते. त्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो होतो, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.

त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दिखाव्यासाठी केवळ गोरगरिबांच्या पत्राशेडवर कारवाई केली जाते. राजकीय लोकांच्या पत्राशेड, अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.