Pimpri : सह्याद्रीतील छोट्या मावळ्याकडून आफ्रिका खंडातील माउंट किलीमांजारो शिखर सर

एमपीसी न्यूज – आजकालची मुले बालवयातच मोबाईल गेम मधे व्यस्त असतात. व्हिडिओ गेम्स, कार्टून नेटवर्क यामधे स्वतःला इतके वाहून घेतात की इतर मैदानी खेळ खेळण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. मात्र पिंपळे निलख येथील अवघ्या नऊ वर्षाच्या साई सुधीर कवडे या मुलाने आफ्रिका खंडातील माउंट किलीमांजारो शिखर सर करण्याचा चमत्कार केला आहे.

प्रत्येक मुलाला आई-वडील दरवर्षी त्याच्या वाढदिवशी विविध वस्तू भेट देत असतात. पण साई कवडे या मुलाने बालवयातच देशसेवेचे स्वप्न उरी बाळगून अतुलनीय धाडस करत स्वतःच्या वाढदिवशी आफ्रिका खंडातील सर्वात अवघड माउंट किलीमांजारो शिखर सर करून आई ,वडिलांना एक अनोखी भेट दिली.  साई याने माउंट किलीमांजारो शिखरावरील 5895 मीटर उंचीवर उणे 18 अंश तापमानाचा सामना करीत यशस्वी चढाई केली. 18 जानेवारीला आपल्या वाढदिवशी त्याने ही कामगिरी केली.

माउंट किलीमांजारो हा आफ्रिका खंडातील सर्वात उंच पर्वत आहे. टांझानिया देशातील ईशान्य भागात केनियाच्या सीमेजवळ हा पर्वत आहे. या पर्वताची उंची 19341 फूट (5895 मी) इतकी आहे. हा पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झाला असून कोणत्याही पर्वतरांगेचा भाग नसलेला हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. शिखर किलीमांजारो यावर 18994 स्टेला पॉइंट फुटापर्यंत चढाई केली. या मोहीमेला जाण्यासाठी त्याचा नियमित विविध शारीरिक कसरती करत सराव चालू होता. या मोहिमेत त्याच्याबरोबर अनिल वाघ, तुषार पवार, धीरज कळसाईत, प्रियांका गाडे यांचा समावेश होता. या मोहीमेचे नेतृत्व कुमारी प्रियांका गाडे हिने केले. या मोहिमेसाठी विशेष सहकार्य जेष्ठ गिर्यारोहक सुशील दुधाणे यांनी केले. मोहिमेस अर्थसाहाय्य धनंजय ढोरे व अमित पसरणीकर यांच्याकडून करण्यात आले होते.

साई कवडे हा बालेवाडीच्या भारती विद्यापीठ शाळेमध्ये इयत्ता चौथीत शिकत आहे. त्याला लहानपणापासूनच गिर्यारोहणाची आवड आहे. त्यानें आत्तापर्यंत महाराष्ट्रातील ७० हुन अधिक गडकिल्ले पादाक्रांत केले आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर व सर्वात अवघड किल्ला लिंगाणा ज्याचे नुसते नाव घेतले तरी अंगावर काटा येतो. भले भले कसलेले गिर्यारोहक देखील हा गड सर करण्यासाठी दहा वेळा विचार करतात. हा अशक्यप्राय असा गगनाला भिडलेला अभेद्य गड या चिमुकल्या मावळ्याने महाराजांचा वेश परिधान करून चढाई केला आहे.

त्याने लेह लडाख येथील अत्यंत कमी ऑक्सिजन असणारे भारतातील सर्वोच्च ट्रेकेबल शिखर स्टोक कांग्री हे देखील 16500 फुट (5000 मीटर) बेस कॅंप पर्यंत यशस्वी चढाई केली आहे, असे साहस करणारा तो भारतातील सर्वात लहान एकमेव मुलगा आहे व त्याच्या या साहसाची नोंद इनक्रेडिबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुस्तकामध्ये सुध्दा झालेली आहे. तसेच ज्येष्ठ इतिहासकार आप्पा परब यांच्या हस्ते साईला किल्ले प्रतापगडावर मावळा ही उपाधी देउन गौरवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.