Pimpri : …म्हणून त्यांनी दुकानदाराला लुटले; आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

... So they robbed the shopkeeper; The accused is in the custody of the crime branch

एमपीसी न्यूज – दुकानात काम करणाऱ्या मुलाने शेजारच्या दुकानदारासोबत भांडण केले. त्यावरून दुकानदाराने मुलाला कामावरून काढून टाकले. याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून भांडण झालेल्या दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून लुटले. दरम्यान, लूटमार करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

21 जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एमआयडीसी भोसरी परिसरातील गुरुदत्त एंटरप्रायजेस या दुकानाच्या मालकाला शस्त्राचा धाक दाखवून पाच इसमांनी लुटले. दुकानातून दोन लाख रुपये व लॅपटॉप चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेला.

याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस करीत होते. दरम्यान, पोलीस शिपाई विजय मोरे यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी पिंपरी मधील गांधीनगर परिसरात आहेत.

त्यानुसार पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या अन्य चार साथीदारांसोबत मिळून गुन्हा केल्याचे कबूल केले.

ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुलगा पूर्वी गुरुदत्त एंटरप्रायजेस या दुकानाच्या शेजारच्या दुकानात काम करीत होता. मुलाने गुरुदत्त एंटरप्रायजेस दुकानाचे मालक अरुण प्रल्हाद गाडेकर (वय 41) यांच्याशी भांडण केले. यावरून मुलाच्या दुकानदाराने मुलाला कामावरून काढून टाकले.

अरुण गाडेकर यांच्यामुळे आपल्याला कामावरून काढून टाकल्याचा राग मुलाच्या मनात होता. तसेच अरुण गाडेकर यांच्या दुकानात भरपूर रक्कम असल्याचे आरोपी मुलाला माहिती होते. त्यामुळे त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून गाडेकर यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटले.

त्यानंतर आरोपींनी नेहरूनगर पिंपरी येथे एका पेट्रोल पंपावर दोन मोटार सायकलमध्ये पेट्रोल भरून जबरदस्तीने पंपावर काम करणा-या कामगाराकडून पाच हजार रुपये हिसकावून नेले. हा गुन्हा देखील याच आरोपींनी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी विजय मोरे, प्रवीण पाटील, आप्पा लांडे, किशोर परदेशी, अमित गायकवाड, सचिन मोरे, प्रमोद गर्जे, मनोजकुमार कमले, नितीन खेसे, गणेश सावंत यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.