Pimpri: प्लॅस्टिक वापरणा-यांवर धडक कारवाई; एका दिवसात 65 हजार रुपये दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्लॅस्टिकचा वापर करणा-यांवर पुन्हा धडक कारवाईला सुरुवात केली आहे. आज (मंगळवारी) एका दिवसात 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, 40 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. आगामी काळात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, महापालिका संयुक्तपणे प्लॅस्टिक वापरणा-यांवर कडक कारवाई करणार असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले.

पर्यावरणाचा -हास करणा-या प्लॅस्टिकला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने प्लॅस्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या, उत्पादने साठवण्यासाठी असलेली प्लॅस्टिकची आवरणे, द्रवपदार्थ साठवण्याठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक, अन्न पदार्थ साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक, प्लॅस्टिक आणि थर्माकोल डेकोरेशन यावर गेल्या वर्षी बंदी घातली आहे. त्यानंतर महापालिकेकडून प्लॅस्टिक वापरणा-यांवर धडक कारवाई सुरु केली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून कारवाई थंडावली होती. त्यामुळे शहरातील व्यापारी, दुकानदारांनी प्लॅस्टिकचा वापर सर्रासपणे सुरु केला होता.

  • महापालिकेच्या आरोग्य विभागाने कालपासून पुन्हा प्लॅस्टिक वापरणा-यांवर धडक कारवाईला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पथकामार्फत प्लॅस्टिक आणि थर्माकोल वापरणा-यांवर कारवाई सुरु केली आहे. ‘अ’ प्रभागातून पाच हजार रुपये, ‘ब’ प्रभाग 25 हजार, ‘क’ 20 हजार रुपये आणि ‘फ’ प्रभागातील प्लॅस्टिक वाकरणा-यांकडून 15 हजार असा 65 हजार रुपये दंड आज वसूल करण्यात आला आहे. आज एकाच दिवशी 65 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, 40 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. रॉय यांनी दिली.

डॉ. रॉय म्हणाले, ”आगामी काळात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, महापालिका संयुक्तपणे प्लॅस्टिक वापरणा-यांवर कडक कारवाई करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्लॅस्टिक, थर्माकॉलचा वापर टाळावा. प्लॅस्टिक आणि थर्माकोल वापरल्यास पहिल्यांदा आढळल्यास पाच हजार रुपये, दुस-यंदा आढळल्यास दहा हजार आणि तिस-यांदा प्लॅस्टिक आढळल्यास 25 हजार रुपये आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.