Pimpri : आत्मानंद देणाऱ्या व्हायोलिन वादन आणि गायनाने रंगले गानसरस्वती महोत्सवाचे सकाळचे सत्र

एमपीसी न्यूज –  आत्मानंद आणि स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारे व्हायोलिन ( Pimpri ) वादन आणि गायन यांनी 10 व्या गानसरस्वती महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्राला सुरुवात झाली.

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे सुरु असलेल्या या महोत्सवाला आज नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र बिभास आमोणकर, निहार आमोणकर, अपर्णा जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्राची सुरुवात युवा आश्वासक कलाकार जशन भूमकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग गुनकलीने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. त्यांनी ‘डमरू हर कर बाजे…’ ही बडा ख्याल मधील शिवस्तुती आणि ‘जय श्री शंकरा सूत गणेश…’ ही गणेशस्तुती प्रस्तुत केली. यांनतर त्यांनी राग देसकार मध्ये मध्यलयीत ‘हुंतो तोरे कारन जागी रे… ‘ ही बंदिश सादर केली.

जशन भूमकर यांना तेजोवृष जोशी (तबला), ज्ञानेश्वर सोनवणे (संवादिनी), पिनाक सप्रे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या नावाने आणि स्मृतीप्रीत्यर्थ होत असलेल्या या महोत्सवात कला सादर करताना आनंद होत असल्याच्या भावना जशन यांनी व्यक्त केल्या.

यानंतर पं मिलिंद रायकर आणि त्यांचे शिष्य व सुपुत्र यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन सहवादन संपन्न झाले. यावेळी या दोघांनी राग अहिर भैरव प्रस्तुत केला. यानंतर त्यांनी किशोरी आमोणकर यांच्या ‘सजनी कवन देस गयो…’ या बिलासखानी तोडीतील बंदिशीने समारोप केला.

आमचे भाग्य थोर आम्ही किशोरी ताईंपर्यंत पोहोचले नाहीतर आमचे काय झाले असते कोणास ठाऊक अशा शब्दांत पंडित मिलींद रायकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आज किशोरीताई यांसोबत असलेली टीम पाहून भरून आले आहे आणि दडपणही वाढले आहे अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

पं मिलिंद रायकर आणि यज्ञेश रायकर यांना विश्वनाथ शिरोडकर (तबला), नुपुरा जोशी भिडे (स्वरमंडल), केदार जोशी व रविराज काळे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्राचा समारोप किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग ललतची बहारदार प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी विलंबित एकतालातील ‘रैन का सपना…’ आणि ‘घन घोर झांझरिया बाजे…’ या बंदिशी सादर केल्या. राग चारुकेशी मध्ये उस्ताद आमीर खान साहेबांची ‘लाज रखो तुम मोरी घुसैयां…’ ही बंदिश देखील त्यांनी प्रस्तुत केली.

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरू राघवेंद्र स्वामी यांवरील ‘श्री गोविंदा गोविंदा…’ हे कन्नड भक्तीगीत त्यांनी सादर केले. ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा…’ या कन्नड भजनाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.

आज गानसरस्वती महोत्सवात सरस्वती समोर गायनसेवा सादर करायला मिळत आहे, हे माझ्यासाठी मोठं भाग्य आहे, असे मेवुंडी म्हणाले.

त्यांना पांडुरंग पवार (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) आणि पराग सप्रे व शुभम खंडाळकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

विघ्नेश जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ( Pimpri ) केले.

https://www.youtube.com/watch?v=bmL7SiXmo9Q&pp=ygUJbXBjIG5ld3Mg

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.