LokSabha Election 2024 :   उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची उद्या तिसरी तपासणी  

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या ( LokSabha Election 2024) दैनंदिन खर्चाची  तिसरी तपासणी शनिवार दि. 11 मे 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारतीमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पार पडणार आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली आणि दुसरी  तपासणी अनुक्रमे दि. 3 मे आणि दि. 7 मे 2024 रोजी  निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांच्या उपस्थितीत तसेच निवडणूक खर्च तपासणी प्रमुख अश्विनी मुसळे आणि सहाय्यक सविता नलावडे यांच्या अधिपत्याखाली पार पडली. निवडणूक खर्च तपासणीमध्ये प्रथम तपासणी वेळी खर्च सादर न करणाऱ्या 6 उमेदवारांना तर निवडणूकीतील दैनंदिन खर्च तपासणीकरीता सादर केला असताना त्यात आढळून आलेल्या तफावतीबाबत 3 उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी नोटीस बजावली होती. दुसऱ्या तपासणीवेळी देखील खर्च सादर न करणाऱ्या 2 उमेदवारांना तर योग्य बँक खात्यांमधून निवडणूकीचा खर्च न केल्याबद्दल एका उमेदवाराला सिंगला यांनी नोटीस बजावली असून नोटीस प्राप्त झाल्यापासून 48  तासांच्या आत या उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा खुलासा सादर करण्याबाबत नोटीसीद्वारे कळविण्यात आले आहे.

Thergaon : कॅन्सर रूग्णालयाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

दरम्यान, पहिल्या तपासणीवेळी ज्या उमेदवारांनी आपला निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला नव्हता त्यांनी दुसऱ्या तपासणीवेळी त्याबाबतचा खर्च तपशील सादर केला. यामध्ये नामनिर्देशन रॅली, वाहन परवाने, भोजन व्यवस्थापन, कोपरा सभा, मेळावे यांचा खर्च आदी बाबींचा समावेश होता. तसेच निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षाकडून दुबार नोंद झालेल्या खर्चाच्या नोंदी एलईडी प्रचार व्हॅन, प्रचार साहित्य, झेंडे इत्यादी बाबींचा तपशीलदेखील सुधारित करण्यात आला आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग  बारणे यांच्या दुसऱ्या निवडणूक खर्च तपासणीनंतर त्यांच्या निवडणूक खर्चातील तफावत 2 लाख रुपये इतकी आढळली आहे. तर शिवसेना (उ.बा.ठा.) चे उमेदवार संजोग  वाघेरे यांच्या निवडणूक खर्चातील तफावत 37 हजार 409 रुपये इतकी आहे.

मावळ लोकसभा निवडणूक रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांनी पुढील तिसऱ्या तपासणीवेळी निवडणुक खर्चाचे लेखे मावळ लोकसभा मतदारसंघ, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष येथे न चुकता सादर करणे बंधनकारक आहे. भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासला जात असून उमेदवारांच्या प्रचार खर्चाची मर्यादा रक्कम 95 लाख रुपये एवढी आहे. उमेदवारांनी रोजचा प्रचार खर्च नोंदविणे आवश्यक आहे. दैनंदिन खर्च तपासणीवेळी खर्च अहवाल सादर न करणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार नोटीस बजावण्यात येत आहे.

तसेच ज्या उमेदवारांच्या दैनंदिन खर्चामध्ये तफावत आढळेल त्यांना देखील नोटीस बजावली जाते. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिनस्त खर्च व्यवस्थापन कक्ष, फिरते भरारी पथक, स्थिर सनियंत्रण पथक, व्हिडिओ संनियंत्रण पथक, व्हिडीओ पाहणारे पथक आदी विविध पथके कार्यरत आहेत. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये एकूण 33 उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांच्या दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जात आहेत. त्याचवेळी व्हिडिओ नियंत्रण व पाहणाऱ्या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टरमध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदवला जात असून इतर पथकांकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद घेतली जात आहे, असे निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षाच्या वतीने सांगण्यात आले ( LokSabha Election 2024) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.