Pimpri: ….तर आयुक्तांच्या बंगल्यात कचरा फेकणार

शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा नियमित उचलला जात नसल्याने शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सर्वत्र दुर्गंधी सुटली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे दोन दिवसांत शहरातील कचरा कोंडी सोडवा अन्यथा महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात कचरा फेकण्यात येईल, असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी दिला आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यात उबाळे यांनी म्हटले आहे, संपूर्ण शहरातील कचरा गोळा करण्याचे काम दोनच ठेकेदाराला देऊन मोठी आर्थिक उलाढाल केली जात आहे. त्याला राजकीय मंडळींची देखील साथसंगत लाभत आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपचे नगरसेवकच महापालिकेत कचरा आणून टाकत असताना महापालिका प्रशासन मात्र, त्याकडे डोळेझाक करत आहे.

शहराच्या विविध भागातील कचरा नियमितपणे उचलला जात नाही. त्याचप्रमाणे रस्त्यांची साफसफाई देखील केली जात नाही. त्यामुळे सर्वत्र कच-याचे ढीग साचले असून शहरभर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचरा उचलणा-या गाड्या वेळेवर आणि नियमितपणे येत नाहीत. सध्या पावसामुळे कचरा ओला झाला असून त्याची सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आदींसारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यातूनच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आयुक्तपदाचा कार्यभार श्रावण हर्डीकर यांनी स्वीकारल्यानंतर महापालिका कारभाराची वाटच लागली आहे. शहर स्वच्छतेच्या बाबतीत पिछाडीवर पडले आहे, असा आरोप उबाळे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like