Pimpri Unlock Update: केश कर्तनालये सुरू, पण कटिंगचा दर 100 रुपयांवर, कारागिर नसल्याने ग्राहकांना ‘वेटींग’

Pimpri Unlock Update: Salons open, but the cutting rate at Rs 100, waiting for customers as a shortage of artisan

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील सुमारे दोन हजार सलून, केश कर्तनालये आज (रविवार) पासून सुरु झाली आहेत. मात्र, दुकानदारांसमोर कामगार उपलब्ध नसल्याने समस्या उभी राहिली आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार केवळ कटिंग केली जाणार असून, त्याच्या दरात 30 रुपयांची वाढ झाली आहे. कटिंगसाठी आता 100 रुपये इतका दर निश्‍चित करण्यात आल्याचे राज्य नाभिक महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शाखेने म्हटले आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये 23 मार्चपासून सलून, केश कर्तनालये बंद होती. भोसरीत सर्वाधिक 300, काळेवाडी, थेरगाव परिसरात 200, तर दिघी भागांत सुमारे 100 दुकाने आहेत. प्रत्येक दुकानात सरासरी 2 ते 3 कारागीर काम करतात. त्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांबरोबरच उत्तर प्रदेश व बिहारमधील कारागिरांची संख्या मोठी आहे. मात्र, हे कारागीर सध्या त्यांच्या गावी परतले आहेत. ग्राहकांना सेवा देण्यासाठी कारागिर उपलब्ध असल्याने दुकानदारांसमोर समस्या निर्माण झाली आहे.

महासंघाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अशोक मगर म्हणाले, “सर्व सलून, केशकर्तनालये चालू झाली तरी व्यवसाय सुरुवातीला मंदीतच राहण्याची अपेक्षा आहे. दुकानदारांना कारागिरांची समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र, दुकान चालू झाल्याचे समजल्यानंतर हे कारागीर परत येतील. सध्या आम्हाला केवळ कटिंगची परवानगी मिळाली आहे. प्रत्येक ग्राहकासाठी नवीन चादर, सॅनिटायजर वापरावे लागणार आहे. तसेच 60 टक्के दुकाने भाड्याने असल्याने आम्हाला कटिंगचे दर वाढवावे लागत आहे. पूर्वी कटिंगचे दर 70 रुपये इतके होते. आता, कटिंगसाठी 100 रुपये दर आकारला जाईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.