Dehuroad: देहूरोड, दिघीमध्ये घरफोडीच्या तीन घटना; साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास

Dehuroad: Three burglary incidents in Dehuroad, Dighi; looted worth Rs 9.5 lakh material घरातून कानातील सोन्याचे झुमके आणि वेढणे, असा एकूण 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

एमपीसी न्यूज- देहूरोड येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 50 हजारांचे दागिने चोरून नेले. तर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळवडे येथे एका कंपनीतून पावणे नऊ लाखांची कॉपर वायर चोरून नेली. तिसरी घटना दिघी येथे घडली असून यामध्ये चोरट्यांनी घरातून 25 हजारांचे साहित्य चोरून नेले आहे.

पहिल्या घटनेत अमित कुमार देविदास शिंदे (वय 29, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 26 जून रोजी उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांचे घर 17 जून ते 26 जून या कालावधीत कुलूप लाऊन बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा काढून घरात प्रवेश केला.

घरातून कानातील सोन्याचे झुमके आणि वेढणे, असा एकूण 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या घटनेत विलास जयराम पाटील (वय 32, रा. देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (दि. 27) सकाळी तळवडे येथील श्री साई क्रेन सर्विस कंपनीत उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तळवडे येथील श्री साई क्रेन सर्विस या कंपनीतून 8 लाख 86 हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

तिस-या घटनेत विजयकुमार रामचंद्र गोळे (वय 70, रा. जुना आळंदी पूल, आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 21 जून टे 27 जून या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जून दुपारी एक ते 27 जून सकाळी साडेआठ या कालावधीत फिर्यादी यांचे घर बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी लाकडी दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला.

घरातून टीव्ही, पितळेची भांडी, व्हीसीआर मशीन, जुन्या जीपगाडीचे लोखंडी साहित्य, चांदीचे पैंजण असा एकूण 25 हजारांचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.