Pune: ब्राह्मणभूषण पुरस्कार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना प्रदान

एमपीसी न्यूज – आपल्या अस्मितेची विस्मृती झाली की राष्ट्र लयाला जाते म्हणून स्वत्व आणि अस्मिता प्रत्येकाने जागृत ठेवण्याची गरज आहे, प्रसंगी दुष्प्रवृत्तींवर प्रहार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन हिंदूत्वाचे कट्टर पुरस्कर्ते आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी आज येथे व्यक्त केले. ‘आम्ही सारे ब्राह्मण’ पाक्षिकाच्या आठव्या वर्धापनदिनी ब्राह्मणभूषण पुरस्कार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मानपत्र, पुणेरी पगडी आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, बुलढाणा अर्बन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, पाक्षिकाचे संस्थापक संपादक गोविंद हर्डीकर, मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी, ओम एकविरा मीडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक संजय ओर्पे व तरुण उद्योजक सृजन कुलकर्णी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

  • डॉ. शेवडे पुढे म्हणाले की, हिंदू धर्मियांना एक न्याय आणि अन्य धर्मियांना दुसरा न्याय देणारे तथाकथित पुरोगामी जाणीवपूर्वक बुध्दीभेद सध्या समाजमाध्यमांतून घडवत आहेत. समाजात सुरु असणार्‍या या दांभिकपणावर प्रहार करणे आवश्यक आहे. सातत्याने केवळ एकच बाजू मांडली जात आहे आणि कालांतराने ती खरी वाटायला लागते, म्हणजे बुद्धिभेद करण्यात येतो आहे. या प्रक्रियेला थांबवणे गरजेचे आहे आणि त्यावर तात्काळ प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. यासाठी आपला अभ्यास वाढवण्याची गरज आहे.

अध्यक्षीय मनोगतात बोलतांना डॉ. देखणे म्हणाले की, समाजात अनाठायी वाद निर्माण करणार्‍यांना आज प्रतिष्ठा मिळते हे शल्य आहे. हे शल्य घालवण्यासाठी ज्ञानाचा आणि गुणवत्तेचा सन्मान झाला पाहिजे. ब्राह्मण समाजाने देखील आपल्यावर होणार्‍या टिकेचा पुरेपूर समाचार घेतला पाहिजे मात्र त्यासाठी इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे व अभ्यासपूर्ण मांडणी करण्याची गरज आहे.

  • यावेळी इंदूमती-वसंत करिअर भूषण पुरस्कार कोकणातील तरुण उद्योजक सृजन कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. मधुमक्षिका पालन व मत्स्यशेती यामध्ये करिअर केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. शेती व शेतीपूरक व्यवसायात अधिकाधिक तरुणांनी काम सुरु करण्याचे आवाहनही यावेळी कुलकर्णी यांनी केले.

श्री. शिरीष देशपांडे यावेळी म्हणाले की, सद्विचाराने वागणारे नागरिक जेंव्हा दुष्प्रवृत्तींबाबत काहीच न बोलता गप्प बसतात अशावेळी जास्त चिंता वाटते. चूकीच्या गोष्टींना आळा बसवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. गरजू तरुणांना उद्योग-व्यवसायासाठी तात्काळ आर्थिक सहाय्य करण्याची आमची तयारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

  • डॉ. शेवडे लिखित सत्य सांगा ना (नाविन्य प्रकाशन) या पुस्तकाचे आणि जेष्ठ पत्रकार शामसुंदर मुळे यांच्या शिवचरित्र-एक चिकित्सा (कॉन्टिनेन्टल प्रकाशन) या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. याखेरीज वा. वि. भिडे लघुकथा स्पर्धा पारितोषिक, गुणवंत ब्राह्मणमुद्रा पारितोषिक, गुणवंत लेखक पारितोषिक आणि गुणवंत प्रतिनिधी पारितोषिक पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. त्याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी निधी यावेळी प्रदान करण्यात आला.

मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात पाक्षिकाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला व पाक्षिक सुरु करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. शेवडे यांच्या मानपत्राचे वाचन श्रुती कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्थेच्या संचालिका मीनल ओर्पे यांनी केले. पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर डॉ. देखणे व सहकलाकारांनी महाराष्ट्राच्या लोककलेची, त्याच्या परंपरेची विविध रूपे उलगडून दाखवणारा बहुरूपी भारूड हा कार्यक्रम सादर केला. त्यामध्ये दिंडी, फुगडी, जात्यावरची ओवी, वासुदेव, गोंधळ, कडकलक्ष्मी, भुत्या, जोगवा आणि पसायदान असे लोककलेचे अनेक प्रकार सादर झाले व उपस्थित मंत्रमूग्ध झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.