Pune : बिल्डरने केलेली खोदाई शेजारच्या इमारतीसाठी ठरतेय संकट ; रहिवाशांचा मेणबत्ती मोर्चा

अखेर बिल्डरकडून मातीचा भराव टाकण्यास सुरुवात

एमपीसी न्यूज- बांधकाम व्यावसायिकाने सुरु केलेल्या खोदाईमुळे शेजारीच असलेल्या इमारतीच्या खांबांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सोसायटी मधील रहिवाशांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार बनली आहे. या समस्येकडे पालिकेच्या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील रहिवाशांनी रविवारी (दि. 7) संध्याकाळी मेणबत्ती मोर्चा काढला.

अलीकडेच पुण्यामध्ये भिंत कोसळून झालेल्या दोन दुर्घटनेमध्ये 21 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. केवळ बिल्डरच्या गलथानपणामुळे निष्पाप जीवांचा बळी गेला. या घटनांनंतर पालिका प्रशासन पूर्णपणे खडबडून जागे झाले आहे, असे म्हणता येणार नाही. कारण धानोरी इथं एका जागेमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने सुरु केलेली खोदाई शेजारीच असलेल्या मयूर किलबिल सोसायटी मधील रहिवाशांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार बनली आहे. या संपूर्ण प्रकाराकडे पुणे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील रहिवाशांकडून करण्यात आला.

धानोरी येथे मध्यवस्तीमध्ये बंटी बिल्डर्स या बांधकाम व्यावसायिकाने आपल्या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम सुरु केले आहे. त्यासाठी सुरु केलेल्या खोदाईमुळे शेजारच्या मयूर किलबिल सोसायटीच्या इमारतीचे पाच खांब त्याच्या पायासहित पूर्णपणे उघड्यावर आले. त्यामुळे या इमारती धोकादायक बनल्या आणि रहिवाशांवर मृत्यूचे संकट उभे ठाकले.

याबाबत पालिका प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून वारंवार करण्यात आली . मात्र त्याला पालिकेने पाहणी करतो, कारवाई करतो असे थातुरमातुर उत्तर दिले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली नाही. तसेच या नागरिकांनी ग्राहक पंचायतीकडे दाद मागितली. ग्राहक पंचायतीने देखील या संदर्भात पाठपुरावा केला. पण बिल्डरकडून खोदाईचे काम सुरूच राहिले. अखेर कंटाळून येथील नागरिकांनी या समस्येकडे पालिकेच्या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी संध्याकाळी मेणबत्ती मोर्चा काढला. यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते.

अखेर या संदर्भात वृत्त प्रसारित झाल्यानंतर संबंधित बिल्डरने आज सकाळपासून खोदाई केलेल्या भागामध्ये भराव टाकण्यास सुरुवात केली आहे. याबाबत बोलताना स्थानिक रहिवाशी नागनाथ ढोले म्हणाले, ” बिल्डरने सुरु केलेल्या कामामुळे आमच्या इमारतीचा पाया धोकादायक बनला आहे. याबाबत अनेकवेळा बिल्डरकडे तक्रार केली मात्र त्याकडे बिल्डरने दुर्लक्ष केले. त्यासाठी रहिवाशी व गाळेधारकांची एनओसी घेतलेली नाही. त्याशिवाय या बांधकामामुळे आमच्या सोसायटीचा रस्ता बंद झाला असून इमारतीमध्ये येण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. भविष्यात आगीसारखी दुर्दैवी घटना घडल्यास अग्निशामक दलाची गाडी सुद्धा इथे पोहोचू शकणार नाही. इमारत पडल्यानंतर मेलेल्या लोकांना 5 लाख देऊन उपयोग नाही” अशी संतप्त प्रतिक्रिया ढोले यांनी व्यक्त केली. या संधर्भात पुणे महापालिका प्रशासन बिल्डरच्या विरोधात काय कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.