Pune : वीजबिल ऑनलाईन पद्धतीने भरल्याने दर महिन्याला पुणेकर नागरिकांची सव्वादोन कोटींची आर्थिक बचत

एमपीसी न्यूज : वीजग्राहकांनी वीजबिलाच्या रकमेचा तत्पर भरणा (Pune) (प्रॉम्ट पेमेंट) केल्यास महावितरणकडून एक टक्के सवलत दिली जाते. राज्यात ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात व ‘गो-ग्रीन’ योजनेत आघाडीवर असलेल्या पुणे परिमंडलामध्ये सध्या दरमहा सरासरी 11 लाख 5 हजार वीजग्राहक या सवलतीद्वारे सुमारे 2 कोटी 26 लाख 65 हजार रुपयांची बचत करीत आहे.

घरबसल्या व सुरक्षितपणे ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिल भरणा करणे सोयीचे झाल्याने प्रॉम्ट पेमेंटच्या एक टक्का सवलतीचा लाभ मिळत असलेल्या ग्राहकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

महावितरणकडून वीजबिलांच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये वीजबिलाच्या रकमेचा तत्पर भरणा केल्यास एक टक्के सवलत दिली जाते. देयकाच्या तत्पर भरण्याची (प्रॉम्ट पेमेंट) तारीख संबंधित देयकामध्ये नमूद केली जाते.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरामध्ये दर महिन्यात सरासरी 6 लाख (Pune) 46 हजार 871 वीजग्राहक वीजबिलांचा तत्पर भरणा करून 1 कोटी 37 लाख 4 हजार रुपयांची सवलत घेत आहेत.

तर पिंपरी चिंचवड शहरातील सरासरी 2 लाख 87 हजार 90 वीजग्राहक 55 लाख 70 हजार रुपयांची तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामध्ये सरासरी 1 लाख 71 हजार 815 वीजग्राहक 33 लाख 87 हजार 750 रुपयांची सवलत घेत आहेत.

जे वीजग्राहक प्रामुख्याने रांगेत उभे न राहता ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिल भरतात ते प्रॉम्ट पेमेंटच्या सवलतीचा अधिक संख्येने लाभ घेतल्याचे दिसून येत आहे.

वीजबिलांचा ऑनलाईन भरणा केल्यास 0.25 टक्के (500 रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. महावितरणचे मोबाईल ॲप किंवा www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटद्वारे ग्राहकांना क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे सोयीने व सुरक्षितपणे घरबसल्या वीजबिल भरण्याची सोय आहे.

तसेच महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाल्यास छापील कागदी वीजबिलाची प्रतीक्षा करण्याऐवजी ते ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ने लगेचच संबंधित ग्राहकांना पाठविण्यात येते.

सोबतच प्रतिबिलात 10 रुपये सवलत दिली जाते. त्यामुळे वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे. पुणे परिमंडलात ‘गो-ग्रीन’मध्ये सहभागी एक लाख 5 हजार 19 ग्राहकांच्या वीजबिलामध्ये वार्षिक 1 कोटी 26 लाख 2 हजार 280 रुपयांची बचत होत आहे.

Alandi : वेदश्री तपोवनमध्ये 33 कुंडीय महाविष्णूयाग यज्ञाचे उत्साहात आयोजन

याबाबत पुणे परिमंडळ विभागाचे मुख्य अभियंता महावितरण विभागाचे राजेंद्र पवार म्हणाले की, ‘वीजबिलांबाबत असलेल्या सवलतींचा लाभ घेतल्यास आर्थिक बचतीची वीजग्राहकांना संधी आहे. प्रत्येक वीजबिलासाठी ‘ऑनलाइन’ भरणा, प्रॉम्ट पेमेंट व ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये आर्थिक सवलत आहे.

तसेच पर्यावरणपूरक इतरही फायदे आहेत. सर्व वीजग्राहकांनी या सवलतींचा लाभ घ्यावा ही विनंती त्यांनी केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.