Pune Drugs News : माफिया ललित पाटीलच्या भावासह अजून एकजण अटकेत; नेपाळला पळून जायचा डाव पोलिसांनी उधळला

एमपीसी न्यूज : पुण्यासह राज्यात गाजत असलेल्या (Pune Drugs News) ससून रुग्णालयाजवळील 2 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य मोहरा व ड्रग माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील व त्याच्या एका साथीदाराला पकडण्यात पुणे पोलिसांना 9 दिवसांनी यश आले. मात्र, ललित पाटील अद्यापही फरार आहे.

भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील बारा बनकी या शहरातून दोघांना अटक करण्यात आली. हे दोघेही नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते.

भूषण पाटील, ललित पाटील आणि अभिषेक बलकवडे यांचा पुणे पोलिसांकडून युद्ध पातळीवर शोध घेतला जात होता. गुन्हे शाखेची वेगवेगळी दहा पथके त्यांच्या मागावर होती. गेल्या आठ दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र, आज हे दोघेही नेपाळमधून परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांना माहिती मिळाली होती.

Pune : पुण्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

दरम्यान पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 1 ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दोघांना पकडले (Pune Drugs News)  होते. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले होते. त्यांच्या चौकशीत रुग्णालयात उपचार घेणारा कैदी ललित पाटील हा ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या असल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्याचे दोन आयफोन जप्त करत तपासाला सुरूवात केली. मात्र, दुसऱ्याच दिवशी ललित पाटीलने ससूनमधून पळ काढला. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळले. तपासात ललितचा भाऊ भूषण व अभिषेक यांनी हे0  ड्रग्स ससून रुग्णालयात ललितकडे आणून दिल्याचे समोर आले होते.

दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने पुणे पोलिसांनी या दोघांना पकडले आहे. त्यांना घेऊन पोलीस पुण्यात येत आहेत. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या ललित पाटीलचा थांगपत्ता अद्याप तरी पोलिसांना लागलेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.