Pune : विदेशातून परतलेल्या नागरिकांना नाहक त्रास दिल्यास होणार कारवाई -जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज – विदेशातून परतलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना सोसायटीत प्रवेश न देणे, बहिष्कार टाकणे व नाहक त्रास देण्याचे काही प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आले आहेत. नागरिकांनी जाणीवपूर्वक कुणालाही त्रास देऊ नये. तसेच विदेशातून आलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहिता अन्वये कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिली.

कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भावाची अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करणारे परिपत्रक जिल्हाधिकारी राम यांनी काढले. त्यात म्हटले आहे की, जगभरात कोरोना या विषाणूचा संसर्ग होण्यास थोड्याफार प्रमाणात सुरुवात झाली आहे. कोरोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव आहे.

31 डिसेंबर 2019 रोजी चीन देशातील वूहान शहरात कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर चीनच्या इतर शहरात आणि प्रांतातही या आजाराचे रुग्ण आढळले. चीनच्या बाहेर भारत, इटली, दक्षिण कोरिया, श्रीलंका, नेपाळ, जपान, थायलंड, दुबई, अमेरिका, फ्रान्स, सिंगापूर, मलेशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, स्पेन, डेन्मार्क, पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळले आहेत.

भारतात परदेशी नागरिकांसह या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात कोरोना या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेने या आजाराला जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. कोरोना या आजाराची मुख्य लक्षणे ही श्वसनसंस्थेशी निगडित आहेत. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया, काहीवेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे मुख्यत्वेकरून आढळतात.

कोरोना विषाणूमुळे होणारा आजार नेमका कसा पसरतो, याबाबत अजून बरीच संदिग्धता आहे. तरी देखील सर्वसाधारणपणे हा आजार शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात, त्यातून पसरतो. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोरोना बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग मुंबई-पुण्यासह देशातील 21 विमानतळांवर सुरू करण्यात आले आहे. या स्क्रीनिंगमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्याची सुविधा पुणे येथील नायडू रुग्णालय आणि पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालय येथे करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी नागरिकांना त्यांच्या घरांमध्ये अलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. काही नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. काही नागरिक विदेशातून प्रवास करून भारतात दाखल झालेले आहेत. ते त्यांच्या घरामध्ये अलगीकरण कक्षामध्ये राहत आहेत. ते त्यांच्या घरात राहिल्याने सोसायटीतील इतर कुटुंबांना संसर्ग होणार नाही. विदेशातून भारतात परतलेले नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रशासनाकडे काही तक्रारी करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये सोसायटीतील नागरिक त्यांच्याशी बहिष्कार टाकल्यासारखे फटकून वागत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा संबंधित कुटुंबांना नाहक त्रास होत आहे.

अशा घटनांची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवलकिशोर राम यांनी नागरिकांना विनाकारण त्रास न देण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा बाबी निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार तसेच अन्य तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले आहे.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता शॉपिंग मॉल बंद
कोरूना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ‘साथरोग प्रतिबंधात्मक कायदा’ 13 मार्च पासून लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्यातील सर्व शॉपिंग मॉल मधील सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये औषधे, अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू यांची दुकाने वगळण्यात आली आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आदेश दिले आहेत.

शाळा, महाविद्यालये व प्रशिक्षण केंद्रे राहणार बंद
साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये पुणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालये, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले आहेत. 31 मार्चपर्यंत वरील सर्व शाळा, महाविद्यालये व प्रशिक्षण संस्था बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान दहावी व बारावीच्या परीक्षा तसेच विद्यापीठांच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. परीक्षेदरम्यान आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाहीत, याची संबंधितांनी दक्षता घेण्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. ज्या संस्था आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या बंद
पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या देखील साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी (दि. 15) आदेश दिले आहेत. 31 मार्च पर्यंत अंगणवाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम रद्द
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये नागरिकांची एका ठिकाणी गर्दी होणारे सर्व कार्यक्रम टाळण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश येईपर्यंत परवानगी देण्यात येणार नाही. तसेच यापूर्वी देण्यात आलेल्या परवानग्या साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये रद्द करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.