Pune News: दहावीची परीक्षा रद्द, माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकृत परिपत्रक

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. याबाबतचे अधिकृत परिपत्रक माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी काढले आहे.

राज्यातील सर्व विभागातील विभागीय सचिवांना हे पत्र पाठविले असून ते शाळांच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2020-21 या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या परीक्षेचे एप्रिल-मे महिन्यात आयोजन केले होते. 29 एप्रिल ते 20 मे 2021 या कालावधीत दहावीची परीक्षा घेतली जाणार होती. परंतु, राज्यात दुस-या लाटेत कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली. रुग्णवाढ अद्यापही सुरुच आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भभवलेल्या असमान्य परिस्थितीमुळे दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये आयोजित केलेली परीक्षा रद्द केली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने परीक्षा रद्द करण्याबाबतचा आदेश 12 मे 2021 रोजी काढला होता.

याबाबतचे अधिकृत परिपत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी काढले आहे. दहावीची परीक्षा रद्द झाल्याची सर्व मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक, इतर सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी असे त्यांनी सष्ट केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.