Pune News – भाजप हा केवळ पक्ष नसून हिंदूत्व विचारधारेचा वाहक आहे – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज –  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष हे हिंदुत्ववादी विचारांचे वाहक आहेत. भारतीय जनता पक्ष ही केवळ एक यंत्रणा असून हिंदुत्वाच्या विचारांचे वाहक आहेत. पक्ष येतील, जातील, नेतृत्व बदलेल पण हिंदुत्वाचा विचार कायम राहील, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

 

कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे आज मॉडर्न महाविद्यालयाच्या सभागृहात शांतनू गुप्ता यांनी लिहिलेल्या आणि मल्हार पांडे यांनी अनुवादित केलेल्या  ‘भाजप काल आज आणि उद्या’ या पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, माळशिरसचे आमदार आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राम सातपुते आणि विधान परिषदेचे सोलापूरचे आमदार प्रशांत परिचारक, पुस्तकाचे मूळ लेखक शांतनू गुप्ता, पुस्तकाचे अनुवादक मल्हार पांडे, कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे संचालक ऋतुपर्ण कुलकर्णी, अमृता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील दिशा आणि विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची खूप मदत होईल. हिंदुत्व हा शाश्वत विचार असून हा शाश्वत विचार प्रत्यक्षात आणणारी यंत्रणा म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. ज्या ज्या वेळी हा शाश्वत विचार क्षीण होत गेला, त्या त्या वेळी आपण गुलामगिरीत आणि पारतंत्र्यात गेलो, हा इतिहास आहे. हा शाश्वत विचार नष्ट कसा होईल, यासाठीच भारतावर परकीयांचे हल्ले झाले असून आपल्या आत्मभानाचे आणि आत्मविश्वासाचे  असलेली प्रतिके म्हणजे अयोध्येतील राम मंदिर, कृष्णजन्मभूमी, काशीविश्वेश्वर मंदिर आणि सोमनाथ मंदिर ही केंद्रे लक्ष्य केली गेली. हिंदुत्वाचा हा विचार क्षीण होऊ नये, पुसला जाऊ नये, कमकुवत होऊ नये यासाठीच हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आणि सावरकरांनी अभिनव भारत संघटनेच्या माध्यमातून हा विचार जोपासला.

 

समाजाचा तेजोभंग करायचा आणि त्याला गुलाम करायचे ही पाश्चात्यांची रणनिती होती. आर्य हे भारताचे मूळ नसून ते बाहेरून आले, असा चुकीचा तर्क मांडून आर्य, द्रविड आणि इतरांमध्ये इंग्रजांनी भांडणे लावली. आर्य बाहेरून आले आहेत, हे सप्रमाण सिद्ध करा, अशी इतिहासकारांनी आग्रही मागणी केल्यावर खोटा इतिहास सांगणा-यांचे धाबे दणाणले. भारतीय संस्कृती आणि सभ्यता ही सर्वात जुनी असून जगाला विचार देणारी ही संस्कृती आहे. भारताला आगामी काळात विश्वगुरू व्हायचे म्हणजे जगावर राज्य करायचे आहे, असा त्याचा अर्थ होत नसून एक शाश्वत विचार आणि विकास विश्वगुरूच्या भूमिकेतून मांडायचा आहे. विषमतेच्या विषवल्लीशिवाय पुढे जाऊ शकतो, हे आत्मभान आणि आत्मतेज आपल्याला समाजाला प्राप्त  करून द्यायचे आहे. हिंदुत्व ही संकुचित संकल्पना नसून ती भारतीय जीवन पद्धतीशी जोडलेली व्यापक संकल्पना आहे. हिंदुत्वाची केवळ शाल पांघरून आम्हाला आमचे हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंदुत्वाच्या विचारधारेवर वाटचाल करणारा भाजप हा केवळ 1980 मध्ये स्थापन झालेला राष्ट्रीय पक्ष नसून याला पाच हजार वर्षांचा पुरातन इतिहास लाभलेला आहे. त्यामुळे आमच्यामुळे भाजप ग्रामीण भागात दारोदारी पोहोचला अशा गमजा किंवा फुशारक्या मारणा-यांनी इतिहासाचा अभ्यास करावा. हिंदू विचार हा केवळ कर्मकांडांशी जोडलेला नसून संस्कृती आणि संस्कारांशी जोडलेला आहे.

 

खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी यावेळी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार राम सातपुते आणि विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी मनोगत व्यक्त केले. पुस्तकाचे मूळ लेखक शांतनू गुप्ता यांनी पुस्तक लेखनामागची भूमिका विशद केली. अनुवादक मल्हार पांडे यांनी पुस्तक अनुवादाची प्रक्रीया उलगडून सांगितली. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे संचालक ऋतुपर्ण कुलकर्णी यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मंजिरी शहाणे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.