Pune News : प्रधानमंत्री संग्रहालयाला काँग्रेसचा विरोध दुर्दैवी – माधव भांडारी
भांडारी म्हणाले की, पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे तीन मूर्ती भवन येथे वास्तव्य होते. तेथे देशाचे पंतप्रधान म्हणून आतापर्यंत काम केलेल्या सर्व चौदा नेत्यांच्या कार्याचे स्मरण करणारे संग्रहालय उभारले आहे. येथे केवळ भारतीय जनता पार्टीचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी किंवा भाजपाचा समावेश असलेल्या जनता पार्टीचे दिवंगत पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे स्मरण केलेले नाही तर काँग्रेसच्या आणि अन्य पक्षांच्या माजी पंतप्रधानांच्या कार्याचाही गौरवपूर्ण उल्लेख आहे. नेहरू गांधी घराण्याच्या नियंत्रणात असलेल्या काँग्रेसने ज्या काळजीवाहू पंतप्रधान गुलजारीलाल नंदा, पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची उपेक्षा केली त्यांचाही गौरव या संग्रहालयात केलेला आहे. अशा स्थितीत काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी या संग्रहालयावर टीका करून ते अन्यत्र उभारायला हवे होते, असे म्हणणे दुर्दैवी आहे.