Moshi News : अपहरण करून खून, मृतदेह फेकला नदीपात्रात ; अल्पवयीन मुलांचे धक्कादायक कृत्य

प्रेमप्रकरण, अपहरण, मारहाण अन् दगडाने ठेचून खून

एमपीसी न्यूज – प्रेमप्रकरण आणि जुने भांडण यातून अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला. त्या रागातून तरूणाचे अपहरण करुन त्याला दगडाने गंभीर मारहाण करण्यात आली. यामध्ये जखमी झालेल्या त्या तरूणाचा यात मृत्यू झाला. आरोपींनी मयत मुलाचा मृतदेह शेल पिंपळगाव येथे नदीपात्रात फेकून दिला. मोशी येथे ही धक्कादायक घटना घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कृष्णा रेळेकर (वय 18, रा. शिवाजीवाडी, मोशी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश विसे (वय 23, रा. शिवाजीवाडी, मोशी) याला एम आय डी सी भोसरी पोलिसांनी अटक केली असून इतर नऊ अल्पवयीन मुलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरण आणि जुने भांडण यातून अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला. त्या रागातून अल्पवयीन मुलांनी इतर सज्ञान आरोपींसोबत मद्यपान करून कृष्णा याचे अपहरण केले. त्यानंतर सर्वांनी मिळून त्याला दगडाने गंभीर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कृष्णा याचा मोठ्याप्रमाणावर रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला. दरम्यान, आरोपींनी कृष्णा रेळेकर याचा मृतदेह शेल पिंपळगाव येथे नदीपात्रात फेकून दिला.

दरम्यान, कृष्णा रेळेकर याच्या आईने मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबवून कृष्णाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. अल्पवयीन आरोपींनी गुरुवारी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी अविनाश विसे याला अटक केली असून इतर नऊ अल्पवयीन मुलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच, फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.