Pimpri News : महापालिका ‘डॉग व्हॅन’ भाडेतत्त्वावर घेणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वापरासाठी पाच श्वान व्हॅन (‘डॉग व्हॅन’) भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. दीड वर्षासाठी घेण्यात येणाऱ्या वाहनांच्या भाड्यापोटी 51 लाख 88 हजार रुपये खर्च होणार आहे.

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वापरासाठी पाच श्वान व्हॅन भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार पाच निविदाधारक प्राप्त झाले होते. त्यातील तीन निविदाधारक अपात्र ठरल्याने उर्वरित दोन निविदाधारकांचे पाकीट उघडण्यात आले.

त्यामध्ये ‘आवटे फॅब्रिकेटर्स अॅण्ड ऑटोमोबाईल वर्क्स’ यांनी लघुत्तम दर सादर केला.त्यांना दर कमी करण्यासाठी तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला. त्यांनी पाच श्वानवाहक वाहने दीड वर्षाकरिता भाडेतत्त्वावर देण्यासाठी अंदाजपत्रकीय दरापेक्षा 9.63 टक्के कमी म्हणजेच 51 लाख 88 हजार रुपये दर सादर केला. त्यानुसार त्यांच्याकडून वाहने भाडेतत्वार घेण्यात येणार आहेत.

प्रतिवर्षी 1 जानेवारी किंवा 1 जुलै रोजी कामगार वेतन कायद्यानुसार कुशल कामगार यांना प्रसिद्ध झालेल्या दराप्रमाणे वेतन लागू राहणार आहे. तसेच वाहन इंधनाच्या खर्चात ‘ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर असोसिएशन ने प्रसिद्ध केलेल्या दराप्रमाणे वाढ किंवा घट करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.