PMC Recruitment: पुणे महापालिकेत नोकरी करायची? 448 जागांसाठी निघाली भरती

असा करा अर्ज..

एमपीसी न्यूज: पुणे महानगरपालिकेत सध्या विविध पदांवरील जागा रिक्त आहेत. मागील दहा वर्षापासून पालिकेत नोकर भरती होऊ शकली नाही. सेवा प्रवेश नियमावली मंजूर न होणे, भरतीला सरकारकडून बंदी घालणे, तर चे रखलेले काम यासह अनेक कारणांनी ही भरती पुढे ढकलण्यात आली होती. (PMC Recruitment) मात्र आता महापालिकेत रिक्त असणाऱ्या जागा भरण्यात येणार आहेत. महापालिकेने श्रेणी दोन व श्रेणी तीन मधील 448 रिक्त पदांसाठी भरती सुरू केली आहे. 20 जुलैपासून यासाठीचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. 

 

 

महापालिकेत सध्या अनेक पदे रिक्त असल्यामुळे एकाच व्यक्तीकडे अनेक पदांचा कार्यभार आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे वेळेत कामे पूर्ण होत नाहीत. याशिवाय अनेक विभागात तात्पुरते कर्मचारी नेमून काम करून घेतले जात आहे. (PMC Recruitment) कोरोना नंतर महापालिकेतील नोकर भरतीवर असलेली बंदी उठवण्यात आली होती त्यानंतर आता महापालिका प्रशासनाने रिक्त जागांची माहिती मागवली असून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महापालिकेत सध्या सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक कनिष्ठ अभियंता लिपिक पदांची भरती करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्राधान्याने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

 

कनिष्ठ अभियंता पदामध्ये स्थापत्य शाखेचे 135, यांत्रिकी शाखेचे पाच आणि वाहतूक नियोजन शाखेचे चार या जागा भरल्या जाणार आहेत. याशिवाय शंभर सहाय्यक अतिक्रम निरीक्षकांची देखील भरती केली जाणार आहे. तर 200 लिपिक भरले जाणार आहेत. चार सहाय्यक विधी अधिकारी ही सरळसेवेने भरले जाणार आहेत अशी माहिती सेवक वर्ग विभागाची उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली आहे.

 

यासाठी पुणे महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत. येत्या 10 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना यासाठी अर्ज भरता येणार आहे. ही परीक्षा केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आयबीपीएस या संस्थेकडून घेतली जाणार आहे. (PMC Recruitment) भरतीची सर्व प्रक्रिया आयबीपीएसच राबवणार. पुण्यासह मुंबई ठाणे नवी मुंबई औरंगाबाद आणि नागपूर या शहरातील 60 केंद्रावर ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ही भरती पारदर्शक आणि गुणवत्तेवर केली जाणार आहे. यात महापालिका कोणताही हस्तक्षेप करणार नाही. नागरिकांनी एजंट किंवा इतरांच्या दबावाला बळी पडू नये असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.