Pune news: सार्वजनिक ठिकाणी होळी, धुलिवंदन साजरे करण्यास मनाई – जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज – राज्यात तसेच पुणे जिल्हयामध्ये कोरोना  प्रादुर्भावाच्या अनुषंगाने  गर्दी टाळण्यासाठी  सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट,   सभागृहे, गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे होळी, धुलीवंदन व रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूचा (कोविड- 19) संसर्ग व प्रादुर्भाव झपाटयाने पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. जिल्हयातील यात्रा, उत्सव आयोजित करण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.

कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर संसर्ग वाढत असल्याची बाब विचारात घेता पुणे जिल्हयाच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये साजरे होणारे होळी व धुलीवंदन सण उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे होळी, धुलीवंदन व रंगपंचमी हे सण उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत आहे.

मनाई आदेशाचे पालन करुन नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सदर आदेशामधील कोणत्याही तरतुदीचा भंग केल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा- 2005 व कायदयातील इतर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.