Pune PIFF Festival News : ऑनलाइन ‘पिफ’ला रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या सावटाच्या परिस्थितीत चित्रपट रसिक मात्र घरबसल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा आस्वाद घेत आहेत. गुरुवारपासून (दि. 18) सुरू झालेल्या ऑनलाइन पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अर्थात ‘पिफ’ला राज्याबरोबरच देशभरातून रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

एकोणिसाव्या ऑनलाइन पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला ‘लैला इन हायफा’ या चित्रपटाने गुरुवारी सुरुवात झाली.

याविषयी अधिक माहिती देताना महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल म्हणाले, ‘कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर चित्रपटगृहात होणारा महोत्सव तात्पुरता स्थगित करीत 18 ते 25 मार्च दरम्यान ऑनलाइन महोत्सव करण्याचा निर्णय घेतला.

अपेक्षेप्रमाणे ऑनलाइन महोत्सवाला चित्रपट रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. उत्तरप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, पंजाब, आसाम अशा अनेक राज्यांमधून प्रेक्षक महोत्सवात सहभागी झाले आहेत.’

या वर्षीच्या ऑनलाईन महोत्सवासाठी न्यूझीलंड येथील शिफ्ट 72 या व्यासपीठाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे पायरसी, रेकॉर्डिंग करता येणे शक्य नसल्याने सुरक्षिततेची भावना असल्याचे अनेक प्रेक्षकांनी कळविले आहे.

शिफ्ट 72 सोबतच महोत्सवात निवडलेल्या गेलेल्या चित्रपटांच्या दूतावासांनी देखील आपापल्या पातळीवर महोत्सवास प्रसिद्धी दिली असून आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.