Pune News : ट्रॅक्टर, ट्रॉली, टेम्पो चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका अट्टल चोरट्याला जेरबंद केले आहे. त्याने केलेले चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून दुचाकी, टेम्पो, ट्रॅक्टर, ट्रॉली असा एकूण 16 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली. अमोल उर्फ अंगद प्रभू माळी (वय 24, रा. वाडेबोलाइ, नायरवस्ती, हवेली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, धावडा वाहन चोरी विरोधी पथकाचे कर्मचारी हडपसर आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी गणेश लोखंडे आणि अमोल सरतापे यांना संबंधित आरोपी विषयी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपी अंगद हा हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरून आला असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशी तो वापरत असलेली दुचाकी चोरीची असल्याचे त्याने कबूल केले.

त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक करून हडपसर येथे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी काही वाहन चोरी केली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याने चोरलेली एक दुचाकी, टाटा कंपनीचा पिकप टेम्पो, टाटा कंपनीचा आणखी एक टेम्पो, जॉन डीयर कंपनी चा ट्रॅक्टर आणि न्यू हॉलैंड कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त केली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस कर्मचारी राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, विनायक रामाने, शाकीर खान, मनोज शिंदे, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव, दत्तात्रेय खरपुडे, अमोल सरतापे यांच्या पथकाने केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.