Pune : जे देशासाठी चांगले आहे, ते माझ्यासाठी चांगले आहे – प्रसून जोशी

एमपीसी न्यूज- राष्ट्रवाद, राष्ट्रीयता या केवळ संकल्पना आहेत. या देशासाठी जे चांगले आहे ते माझ्यासाठी चांगले आहे हे मला समजते. देश हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, देश सर्वात मोठा आहे, असे मत कवी, गीतकार आणि भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी व्यक्त केले. पुण्यात आयोजित ‘वर्डस् काउंट’या कार्यक्रमात ते बोलत होते.

लंडनमध्ये प्रसून जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेल्या मुलाखतीवर खूप टीका झाली होती, त्याविषयी बोलताना जोशी म्हणाले, “मी लंडनमध्ये जाऊन पंतप्रधान मोदी यांची मुलाखत घेऊन, भारताची बदनामी करायची होती का? नरेंद्र मोदी यांचे देशाच्या प्रती असणारे योगदान, ते करीत असलेले काम आणि त्यांच्या काळात होणारी प्रगती हे सगळे मला भावले. ते मला शुध्द असल्याचे वाटते. निंदकांना शेजारी ठेवावे अशी आपल्याकडे म्हण आहे, पण मला वाटते त्यांना डोक्यावर बसवू नये” ते पुढे म्हणाले, की सत्याला सामोरे जायला हवे, कारण या देशात आपल्याला जे सोयीचे नाही, त्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रथा आहे. आपल्याकडे लोकांना लेबल लावली जातात.

जोशी पुढे म्हणाले की, “आता काही लोकांचे मुखवटे उतरले आहेत. काही लोकांचे एकाधिकार होते, ते आता संपले आहेत. काही लोकांना वाटत होते, की त्यांची अभिव्यक्ती हीच अभिव्यक्ती आहे. पण आता हे सगळे बदलले आहे. तंत्रज्ञानांमुळे सगळ्यांकडे माध्यमे आली आहेत. त्यामुळे ते आपापली अभिव्यक्ती करू शकतात आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.