Pune : मुंढवा येथे शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश

एमपीसी न्यूज- मुंढवा येथील केशवनगर भागात शिरलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. दरम्यान, त्याने वनविभागाच्या एका कर्मचाऱ्यावर हल्ला चढविला. यामध्ये त्यांच्या हाताला जखम झाली. त्यानंतर त्याला जाळीत पकडण्यात यश आले असून त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मुंढवा येथील केशवनगर भागात रेणूका माता मंदिरामागे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या शिरला असून त्याने चार ते पाच नागरिकांवर हल्ला केला अशी माहिती मिळाली. यामध्ये एका 7 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या ठिकाणी इमारतीचे काम सुरु असलेल्या जागेत बिबट्या बिल्डिंगच्या खोल डक्टमधे पडला. घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि अग्निशामक दलाचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

बिबट्याला पकडण्यासाठी अग्निशमन दलाने इमारती बाहेर दोन जाळ्या लावल्या होत्या. तिसरी जाळी वनविभागाचे पथक इमारतीत घेऊन गेले. पार्किंगमध्ये बसलेला बिबट्या बाहेर आला. त्यावेळी त्याने वनविभागाच्या एका कर्मचाऱ्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यामध्ये त्याच्या हाताला मार बसला. त्यानंतर बिबट्याला जाळीमध्ये पकडण्यात यश आले.

बिबट्याला जेरबंद केल्यानंतर त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले असून त्याला वनविभागाने रुग्णवाहिकेतून नेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.