Pune : मोदींच्या निवृत्तीनंतर मी ही राजकारण सोडेन – स्मृती इराणी

एमपीसी न्यूज- मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी देणारे हे केवळ नरेंद्र मोदी होते, त्यामुळे जेव्हा ते सक्रीय राजकारणामधून निवृत्त होतील तेव्हा मी देखील राजकारण सोडेन असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केले. पुण्यात पार पडलेल्या ‘वर्डस् काउंट या शब्दोत्सवाच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. यावेळी‘स्क्रिप्टिंग हर स्टोरी -फ्रॉम स्टार टू स्टार कॅम्पेनर’या विषयावर अद्वैता कला यांनी स्मृती इराणी यांची मुलाखत घेतली.

यावेळी स्मृती इराणी म्हणाल्या की, आमचे सरकार हे विकासाच्या मुद्द्यावर तर संघटन हे राजकारणावर सुरु असून एक राजकीय पक्ष म्हणून आम्हाला राजकारण करावेच लागते. मात्र विकासाचा मुद्दा हा आमच्या सरकारसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे.

भारतीय जनता पक्षाने एक महिला म्हणून दुजाभाव केल्याचा अनुभव मला आजपर्यंत आला नाही. ज्याप्रमाणे पुरुष कार्यकर्ता त्याप्रमाणेच एक महिला कार्यकर्ता म्हणून मला आणि इतर महिला कार्यकर्त्यांना समान वागणूक मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. महिलांना 33 टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले मात्र एक महिला अध्यक्ष असलेल्या पक्षाने यासाठी काही केलं नाही ही देशाची व्यथा आहे असेही त्यांनी नमूद केले.

यंदा देखील अमेठीमधून निवडणूक लढवणार का, या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की 2014 मध्ये कोण स्मृती इराणी ? हा प्रश्न अनेकांनी केला मात्र आता 2019 मध्ये सगळ्यांना ‘स्मृती इराणी कोण आहेत’ हे माहिती आहे. परंतु मी अमेठीतून निवडणूक लढविणार की नाही याचा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहा हेच घेतील असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.