Pune : ‘गोपाळ विनायक जोशी माझा समुद्र प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज : आनंदी-गोपाळ हे जोशी दांपत्य भारतीय प्रबोधनातील (Pune) देखणी शोकांतिका होती, असे मत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले. प्रा. डॉ. अनंत देशमुख संपादित ‘गोपाळ विनायक जोशी माझा समुद्र प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. दीक्षित यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, सातारा यांच्या वतीने हा प्रकाशन सोहळा (Pune ) झाला. प्रा. अनंत देशमुख, साहित्यिक, समीक्षक डॉ. वंदना बोकील कुलकर्णी, साहित्यिक व मराठी संशोधन मंडळाचे माजी संचालक प्रदीप कर्णिक यावेळी उपस्थित होते. पुणे विभागाचे सहधर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुके अध्यक्षस्थानी होते. मराठी संशोधन मंडळाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

Pune : ‘नॉर्थ ईस्ट कॉलिंग’ कार्यक्रमाचे आयोजन

प्रा. दीक्षित म्हणाले, आनंदीबाई जोशी या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर, परंतु अमेरिकेतून(Pune)  वैद्यकीय शिक्षण प्राप्त करून आल्यानंतर त्यांचे कर्तृत्व पुरेसे फुलून येण्याआधीच दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे विक्षिप्त पती गोपाळराव स्वतःच्या उत्तम क्षमतांचा पुरेसा वापरच करू शकले नाहीत! त्यामुळे भारतीय प्रबोधनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन व्यक्तींचे जीवन म्हणजे एक शोकांतिका ठरली.

मात्र ती निश्चितच एक देखणी शोकांतिका होती. भारतीय आधुनिकतेचा अर्थपूर्ण अविष्कार त्यांच्याद्वारे घडून आला. पण गोपाळराव हा या अविष्काराचा तुलनेने अज्ञात पैलू होता. डॉ. अनंत देशमुख यांच्या संशोधनामुळे तो अलक्षित पैलू प्रकाशात आला.

गोपाळरावांच्या 1892-1893 मधील इंग्लंड प्रवासाचे ‘केसरी’त लेखमालेच्या रूपाने 19 व्या शतकात प्रसिद्ध झालेले वर्णन साहित्यिक आणि ऐतिहासिक अशा दोन्ही दृष्टींनी महत्त्वाचे आहे. प्रबोधन काळात जी नवी भारतीय स्वत्त्वनिर्मिती होत होती, तिचे दोन महत्वाचे पैलू म्हणजे आधुनिकता आणि भारतीयत्व या दोहोंचा प्रत्यय जोशींच्या प्रवासवर्णनात येतो.

ते प्रकाशात आणून प्रा. अनंत देशमुख यांनी आमच्यासारख्या अभ्यासकांना उपकृत केले आहे. या पुस्तकातून 19 व्या शतकातील मराठी माणसाचे संचित उलगडले असून ते नव्या पिढीने वाचलेच पाहिजे, असे मत बुके यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, जुन्यातील जे चांगले आहे ते आणि पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टी याचा मेळ घालून प्रगती करता येते हा आदर्श आनंदीबाई जोशी आणि गोपाळराव जोशी यांनी घालून दिला. ‘माझा समुद्र प्रवास’मधून जे घेता येईल ते तरुणांनी घेतले पाहिजे. शिक्षण कोणत्याही भाषेत झाले तरी मातृभाषेतील संचित जपले पाहिजे.

प्रा. देशमुख म्हणाले, डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या पती गोपाळराव जोशी यांचे ‘उत्तरायण’ हे चरित्र लिहिताना 1892-1893 सालच्या ‘केसरी’त मला गोपाळराव जोशी यांनी लिहिलेली ‘गोपाळराव जोशी यांचा आगबोटप्रवास’ ही लेखमाला आढळली. ती वाचीत असताना आगबोट प्रवासाविषयी बारकाईने केलेले चित्रण गोपाळराव जोशी यांचे आत्मचिंतन, स्वबांधव आणि परदेशी लोक यांच्याविषयीचे सूक्ष्म चित्रण, त्यांचे भाषावैशिष्टये यामुळे ते मोलाचे प्रवासवर्णनपर लेखन आहे असे माझे मत झाले.

तथापि ‘मराठी प्रवासवर्णन’ प्रबंधांमध्ये त्याची नोंद नसल्याने ते दुर्लक्षित राहिले. ही उणीव भरून काढावी आणि वाचकांचे लक्ष त्याकडे वेधावे या करिता ‘माझा आगबोटप्रवास’ या प्रवास वर्णनाचे संपादन मी केले आहे.

वंदना बोकील कुलकर्णी आपल्या मनोगतात म्हणाल्या, कोणत्याही साहित्य परंपरेत साहित्य निर्मिती आणि साहित्य संपादन या दोन्ही घटकांचे सहअस्तित्व असते. संपादित साहित्याची काही महत्त्वाची प्रयोजने आहेत. त्यात दुर्मिळ संहिता मिळवून, त्यांचे चिकित्सापूर्वक संपादन करून आवश्यक तिथे टिपा परिशिष्ट जोडून साहित्यातील अलक्षित ठेवा उपलब्ध करून देणे हे अत्यंत महत्वाचे प्रयोजन आहे.

प्रा. अनंत देशमुख यांनी गोपाळराव जोशी यांचे ‘माझा समुद्र प्रवास’ हे प्रवासवर्णन उपलब्ध करून देऊन मोलाची कामगिरी बजावली आहे.

डॉ. अनंत देशमुख यांनी मराठी साहित्यातील पहिला अश्लीलतेचा वाद’ शोधून काढून त्यांनी संशोधक-समीक्षकांना विचार करायला प्रवृत्त केले. याकडे कर्णिक यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, केतकर मास्तर, दीनानाथ दलाल, वि. द. घाटे यांची त्यांनी लिहिलेली चरित्रे जाणकारांच्या पसंतीस उतरली आहेत. ‘विशाखा’ भोवती’ हे त्यांचे कुसुमाग्रजांच्या त्याच नावाच्या संग्रहाविषयीचे संशोधन त्यांच्या शोधनाची उंची स्पष्ट करणारे आहे.

गोपाळराव जोशी यांनी त्यांच्या चमत्कारिक वर्तनावर नियंत्रण ठेवले असते तर ते निश्चितच मोठे साहित्यिक होऊ शकले असते, असे शिरिष चिटणीस यांनी प्रास्ताविकात नमूद केले. प्रा. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. या सोहळ्याला रमेश चव्हाण, उद्धव कानडे, सुनील महाजन, राजन लाखे, मदन बोबडे, हेमंत जोगळेकर, वासंती वैद्य, सुनील कर्णिक, प्रा. जे.पी. देसाई, नंदकुमार वढावकर, अशोक इंदलकर, स्वप्निल पोरे, दिनेश फडतरे, आनंद सराफ असे विविध क्षेत्रातील ज्येष्ठ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.