Pune News : मागील वर्षभरात पुणे रेल्वे विभागात दोन लाख 17 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई; 11 कोटींचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – मागील वर्षभरात म्हणजेच एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत पुणे रेल्वे विभागात दोन लाख 17 हजार 633 फुकट्या प्रवाशांवर रेल्वे विभागाने कारवाई केली. या फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेने तब्बल 10 कोटी 94 लाख 66 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

अनियमित प्रवास करणाऱ्या 197 लोकांकडून 93 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, तर सामान बुकिंग न करता घेऊन जाणाऱ्या 1 हजार 414 जणांकडून दोन लाख 13 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

विनातिकीट प्रवासी, अनियमित प्रवास करणारे प्रवासी, तसेच सामान बुक न करता सामान घेऊन जाणारे प्रवासी यांच्याकडून एकूण 10 कोटी 97 लाख 73 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही रक्कम मागील वर्षासाठी तिकीट चेकिंगसाठी दिलेल्या लक्ष्यापेक्षा 83 टक्के अधिक आहे.

सन 2021 – 22 या आर्थिक वर्षात तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून दंड वसूल करण्याबाबत तिकीट तपासणीमध्ये चांगले काम करून तीन तिकीट तपासनीसांनी सर्वाधिक प्रकरणे बनवली. तिकीट निरीक्षक टी. एस. मालुसरे यांनी 7 हजार 864 प्रकरणांमध्ये 41 लाख 96 हजार, आल्विन ध्यान प्रकाश यांनी 7 हजार 233 प्रकरणांमध्ये 40 लाख 87 हजार तर एस. एस. क्षीरसागर यांनी 6 हजार 230 प्रकरणात 34 लाख 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच तिकीट निरीक्षक एस. एस. क्षीरसागर यांनी तिकिट नसलेल्या प्रवाशांची 92 प्रकरणे करून त्यांच्याकडून 91 हजार रुपयांचा दंड वसूल केला, जे या वर्षातील कोणत्याही एका दिवसासाठी सर्वोत्तम प्रदर्शन आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.