Pune : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘वारी नारीशक्तीची’ उपक्रमात आरोग्याचे संदेश

डॉक्टरांनी साधला वारकऱ्यांशी संवाद

एमपीसी न्यूज- आषाढी पालखीनिमित्त `महाराष्ट्र राज्य महिला आयोगा’च्या वतीने `वारी नारीशक्ती`ची या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सक्षमीकरणाच्या दिंडीमध्ये दररोज एक क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असतो. २९ जून (शनिवार) रोजी `डॉक्टर जनरल प्रॅक्र्टीशनर असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. नरेंद्र खेनट आणि डॉ. संगीता खेनट यांच्या नेतृत्वाखाली वीस सभासदांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. सासवड मुक्काम ठिकाणी हा उपक्रम झाला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोग, `वारी नारीशक्ती` उपक्रम संयोजिका उषा बाजपेयी यांनी दिली.

डॉक्टरांच्या विशेष पथकाने आयोगाच्या चित्ररथावरील सॅनेटरिन नॅपकिनचे महत्त्व सांगितले. अध्यात्यामाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत स्वत:चे व समाजाचे आरोग्य कसे जपावे याचे मार्गदर्शन केले. तसेच वारीतील मार्गावर कमीतकमी प्रदूषण होण्यासाठीचे उपाय सांगितले. डॉक्टर्स आणि वारकरी संवाद उपक्रमाला सुवर्णा जोशी, अ‍ॅड.वर्षा डहाळे, मुकुंद वर्मा यांनी सहकार्य केले.

या दिंडीमध्ये महिला सक्षमीकरणाचे संदेश देण्यासाठी वारीच्या दोन्ही मार्गांवर फिरता चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत २९ जून (शनिवार) रोजी `दिवली नाही विझता कामा’ हा लघुपट आणि `दामिनी’ हा चित्रपट दाखविण्यात आला. या संपूर्ण उपक्रमाची संकल्पना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची आहे. त्यांनी उषा बाजपेयी यांच्याकडे दिंडी उपक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी दिली आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवराना आमंत्रीत करणे हे प्रमुख कार्य त्या करीत आहेत. यामध्ये मराठी चित्रपट कलाकार, डॉक्टर्स, क्रीडापटू, वास्तूरचनाकार, वकील, स्वयंसेवी संस्था, आर्मी ऑफिसर, मुस्लिम महिलांचे पथक यांचा सहभाग आहे.

या उपक्रमातील चित्ररथ आणि महिला सक्षमीकरण दिंडीचा शुभारंभ शनिवारवाडा पुणे येथे झाला. महिला सक्षमीकरण हा या दिंडीचा प्रमुख उद्देश आहे. आषाढीची वारी हा महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मक वारसा आहे. या वारीत लक्षावधीच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. यात महिलांचा लक्षणीय सहभाग असतो. अध्यात्माचा समाजप्रबोधनासाठी प्रभावी वापर हे वारीचे खरे सूत्रे आहे. या सूत्राला अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचे कार्य महिला आयोग करत आहे.

वारी नारीशक्तीची या उपक्रमांतर्गत चित्ररथ आणि महिला सक्षमीकरणाची दिंडी समाजप्रबोधनाचे कार्य करणार आहे. महिला सक्षमीकरण या संकल्पनेवर आधारित महिलाचे कीर्तन, भारूड याचे आयोजन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.