Pimpri: विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून पिंपरीत आठ, चिंचवडमध्ये सात अन्‌ भोसरीतून तिघांचे पक्षाकडे अर्ज

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पिंपरी-चिंचवड शहरातील तीन जागांसाठी तब्बल 18 जणांनी निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शविली आहे. पिंपरीतून आठ, चिंचवडमध्ये सात आणि भोसरीतून तिघांचे पक्षाकडे अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, भोसरीतून माजी आमदार विलास लांडे यांनी अर्ज दाखल केला नाही.

पिंपरी 206 विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेविका सुलक्षणा धर, राजू बनसोडे, गोरक्ष लोखंडे, संदीपान झोंबाडे, शेखर ओव्हाळ, सुनंदा काटे, गंगा धेंडे असे आठ जणांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. तर, 205 चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयुर कलाटे, राजेंद्र जगताप, विशाल वाकडकर असे सात जणांनी अर्ज दाखल केला आहे. 207 भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी दत्ता साने, पंडित गवळी, दत्तात्रय जगताप यांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. या 18 मधून कोणत्या तीघांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

  • विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्यांकडून पक्षाने अर्ज मागविले होते. 1 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल करावयाचे होते. यामध्ये शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीकडे अनेकांनी इच्छा दर्शविली आहे.पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत ‘फ्रेश’ चेह-यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे माजी आमदार, माजी नगरसेवकांनी धास्ती घेतली आहे.

पिंपरी मतदारसंघातून आमदार अण्णा बनसोडे, नगरसेविका सुलक्षणा धर, राजू बनसोडे, गोरक्ष लोखंडे, संदीपान झोंबाडे, शेखर ओव्हाळ, सुनंदा काटे, गंगा धेंडे यांनी इच्छुक असल्याबाबतचे अर्ज पक्षाकडे दाखल केले आहेत. त्यामध्ये सुलक्षणा धर आणि शेखर ओव्हाळ यांचे पारडे जड मानले जात आहे.

  • चिंचवडमधून भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयुर कलाटे, राजेंद्र जगताप, विशाल वाकडकर यांनी इच्छूक असल्याचे पक्षाकडे अर्ज केले आहेत. काटे यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक लढविली होती. तर, भोईर, शितोळे, जगताप यांना महापालिका निवडणुकीत पराभव पचवावा लागला. त्यामुळे चिंचवडमधून कोणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भोसरीतून महापालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी नगरसेवक पंडित गवळी आणि दत्तात्रय जगताप यांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. माजी आमदार विलास लांडे यांनी इच्छूक असल्याबाबत अर्ज केला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता साने की गवळी यांना उमेदवारी दिली जाते पेच हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पक्षाचे प्रवक्ते फजल शेख म्हणाले, ”महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या सूचनेनुसार आगामी विधानसभा निवडणूकीसाठी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दिनांक 1 जुलै 2019 पर्यंत उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयात जमा केले आहेत. पिंपरी विधानसभेतून आठ, चिंचवड विधानसभेतून सात आणि भोसरी विधानसभेतून तीन असे तिनही विधानसभा मतदारसंघातून एकूण अठरा उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत. हे अर्ज प्रदेश कार्यालयाकडे पाठविले जाणार आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.