Pune : कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – बॅंकेतून बोलत असल्याचे फोनवर सांगून कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा-या तिघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

सूरज किसन माने (वय 31, रा. कात्रज), मंगेश अशोक माने (वय 24, रा. कात्रज) आणि स्वप्नील तेजेंद्र ठाकूर (वय 29, रा. मोरवाडी पिंपरी पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जसबीरसिंग सेहगल (वय 28. रा. टिंगरेनगर) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिंगरेनगर येथे राहणा-या जसबीरसिंग यांना एका इसमाने फोन करून आपण कोटक महिंद्रा बॅंकेतून बोलत असून तुम्हाला पर्सनल लोन हवे आहे का असे विचारले होते. जसबीरसिंग यांना देखील त्यावेळी कर्जाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि कॅन्सल चेक मागितल्यानंतर त्या इसमास जसबीरसिंग यांनी कॅन्सल चेक दिले.

त्या इसमाने कॅन्सल चेक बॅंकेत आपल्या नावाने वटवून 15 हजारांची फसवणूक केली. त्याचप्रमाणे त्या इसमाने अशाप्रकारे कर्जाचे आमिष दाखवून आणखी दोघांना फसवून एकूण 50 हजार रुपये लुबाडले. याप्रकरणी संबंधित इसमावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याच्या तपास करताना पोलिसांनी यातील आरोपींची सखोल माहिती काढून सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. इतकेच नाही तर त्यांनी ओएलएक्स या वेबसाईट वरून कॅमेरा भाड्याने घेण्याच्या बहाण्याने लोकांकडून कॅमेरे घेतले आणि ते कॅमेरे परस्पर विकले असल्याची देखील माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेले 6 मोबाईल, 1 लॅपटॉप, 10 सिमकार्ड आणि वेगवेगळ्या बॅंकांचे तीन डेबीट कार्ड असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे. सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस उपनिरीक्षक अनिता पवार, महिला पोलीस शिपाई पूजा डहाळे, पोलीस शिपाई आदेश चलवादी, भूषण शेलार, नितीन चांदणे, राहुल हंडाळ यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.