Ravet : महासभेचा शहर सुधारणा समितीला दणका; ‘ग्रीन’चा ‘आर झोन’ करण्याचा प्रस्ताव ‘दप्तरी’ दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने रावेतमधील “ग्रीन झोन’चा “आर झोन’मध्ये फेरबदल करण्याचा सदस्य प्रस्ताव पारित करत अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे पाठविला. मात्र, महासभेने हा प्रस्ताव ‘दप्तरी’ दाखल करत शहर सुधारणा समितीला चांगलाच दणका दिला आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून त्यांच्या विकास आराखड्यामधील रावेत भागातील काही क्षेत्र 1997 साली महापालिककडे वर्ग करण्यात आले आहे. त्यापैकी रावेत येथील सर्व्हे नंबर 123 ते 131 तसेच 219 ते 223 मधील जागा या हरीत क्षेत्रातील (ग्रीन झोन) आहेत. वाल्हेकरवाडी ते रावेत 34.50 मीटर रुंद रस्त्याच्या उत्तर व दक्षिणेला या जमिनी आहेत.

या जमिनींच्या तिन्ही बाजूंनी निवासी व रहिवासी झोन आहे. असे असतानाही केवळ ‘ग्रीन झोन’मुळे येथे काही अंशी शेती व्यवसाय टिकून आहे. मात्र, त्यावर गंडांतर येण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. या ‘ग्रीन झोन’च्या फेरबदलाचा शहर सुधारणा समितीने सदस्य ठराव पारित करत अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे पाठविला होता. मात्र, महासभेने हा प्रस्ताव दप्तरी’ दाखल करत शहर सुधारणा समितीला चांगलाच दणका दिला आहे.

काय होता प्रस्ताव ?

सद्यपरिस्थितीत या जागेवर शेतकऱ्यांना शेती करणे शक्‍य होत नसल्याचा दावा करण्यात आला होता. याठिकाणी झोपडपट्टी होण्याची भीती आहे. त्यामुळे रावेत नाल्याच्या पश्‍चिमेकडील व पवना नदीच्या पूर क्षेत्राच्या (ब्ल्यू लाईन) बाहेरील सर्व्हे क्रमांक 123 ते 131 तसेच सर्व्हे क्रमांक 219 ते 223 शेती ना विकास विभाग व हरित विभागातील जागेच्या वापरात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 37 अन्वये फेरबदल करुन रहिवास विभागात समाविष्ट करण्यास महासभेने मंजुरी द्यावी, असे प्रस्तावात नमूद केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.