Sangvi : प्रेयसीचा खून करून प्रियकराची आत्महत्या

एमपीसी न्यूज – नवी सांगवी येथे प्रेमप्रकणातून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचा वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी एक ते साडेतीनच्या सुमारास नवी सांगवीतील औंध चेस्ट हॉस्पिटल क्वार्टरमध्ये घडली.

आदिती शामसुंदर बिडवे (वय 19, रा. बी बिल्डिंग, कर्मचारी निवास, औंध चेस्ट हॉस्पिटल, नवी सांगवी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. नेईमोदीन बिल्कोसोदीन शहा (वय 21, रा. सिव्हिल हॉस्पिटल क्वार्टर, गोदावरी बिल्डिंग, लातूर) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अभिनय संजय गायकवाड (वय 18, रा. बी बिल्डिंग, कर्मचारी निवास, औंध चेस्ट हॉस्पिटल, नवी सांगवी. मूळ रा. क्रांतीनगर, अंबेजोगाई, जि. बीड) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिती ही मुळची आंबेजोगाई येथील आहे. तिचे वडील लातूर येथील सरकारी रुग्णालयात मेडीकल सुपरिटेंडंट म्हणून काम करीत होते तर आरोपीची आई देखील तिथेच कुक म्हणून काम करत होती. अदितीचे आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण लातूर येथे झाले होते. दरम्यान तिची आणि आरोपीची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे आदितीच्या वडिलांची नांदेडच्या सरकारी रुग्णालयात बदली झाली. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून आदिती व तिच्या भावाला औंध येथील तिच्या काकाकडे शिक्षणासाठी पाठवले होते.

आदितीचे काका कामानिमित्त तिच्या काकूसह गावी आले होते. यावेळी आदिती तिचा सख्खा भाऊ व चुलत भाऊ हे तिघेजण घरी होते. मंगळवारी सकाळी आदितीच्या भावाची नर्सिंगची परीक्षा असल्याने तो पुण्यात निघून गेला. तर चुलत भाऊ अभिनय हा गाडी सर्व्हिसींग करण्यासाठी बाहेर गेला. दुपारी एकच्या सुमारास अदिती घरात एकटीच होती. त्यावेळी आरोपी घरात आला व त्याने घरातील पांढऱ्या रंगाच्या एक्‍सटेंन्शन वायरने आदितीचा गळा आवळला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने ओढणीच्या साहाय्याने घरातील पंख्याला गळफास घेतला.

फिर्यादी अभिनय दुपारी तीनच्या सुमारास काम संपवून घरी आला आणि अदितीला आवाज दिला. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. काही वेळानंतर त्याने घराच्या खिडकीतून वाकून पाहिले असता त्याला आरोपीचा मृतदेह पंख्याला लटकताना तर आदिती जमिनीवर पडलेली दिसली. अभिनय याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला त्यावेळी हा संपूर्ण प्रकार समोर आला. त्याने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.