Chinchwad : दोन मैत्रिणींनी लावला नव्या पद्धतीच्या इंडीकेटरचा शोध

एमपीसी न्यूज – प्रत्येक कारला कंपनीकडून इंडिकेटर बसवले जातात. पण चिंचवड येथील अंकिता अशोक नगरकर आणि रत्ना पाटील या दोन मैत्रिणींनी कारसाठी नव्या पद्धतीच्या इंडिकेटरचा शोध लावला आहे. या इंडिकेटरसाठी या दोघींनी पेटंटसाठी नोंदणी देखील केली आहे. अंकिताचे हे दहावे पेटंट आहे.

अंकिता आणि रत्ना यांनी तयार केलेले हे इंडिकेटर कारच्या समोरच्या आणि मागच्या काचेपासून कारच्या छतावर देखील दिसून येते. या इंडीकेटरचे फायदे सांगताना अंकिता म्हणाली, “प्रचलित वाहनांना इंडीकेटर चार ठिकाणी लावलेले असतात. आम्ही शोधलेले इंडीकेटर हे गाडीच्या छतावर तसेच मागच्या आणि पुढच्या दोन्ही काचांच्या बाजूने चमकते. हे इंडिकेटर एलईडी बल्बच्या पट्टीच्या स्वरुपात आहे. ज्या बाजुला वळायचे अाहे ती पट्टी ब्लिंक होत राहते. आम्ही शोधलेले आधुनिक इंडीकेटर हे वाहनांच्या छतावर बसवलेले असल्याने ट्रकसारख्या उंच वाहन चालवणाऱ्या चालकांना देखील स्पष्टपणे दिसून येतात. त्यामुळे अपघातात घट होईल”

“कंपनीने वाहनांना बसविलेल्या इंडीकेटर सोबतच हे छतावरचे इंडीकेटर देखील कार्य करेल. अल्प खर्चात व कमी वेळात हे इंडीकेटर बसविता येतात. आरटीओ नियमानुसार पिवळा रंग व त्यावर असणाऱ्या प्लास्टिक कव्हरमुळे प्रकाशाची तीव्रता योग्य प्रमाणात आहे. हा इंडीकेटर जगभरात वापरला जाण्याची शक्यता आहे. अपघाताची वाढती संख्या व त्यातून होणारे मृत्यू, येणारे अपंगत्व ही संपूर्ण जगासमोर एक मोठी समस्या बनली आहे. त्यावर उपाययोजना करणे व त्या संबंधित संशोधन करणे, हे कार्य शास्त्रज्ञ अविरतपणे करीत आहेत. यामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यापूर्वी माझी स्टेपलरच्या संशोधनासह इतर नऊ पेटंट रजिस्टर आहेत” असे अंकिता म्हणाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.