Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख -9 – फुलराणी

एमपीसी न्यूज : तिने छोट्या पडद्यावर काम केले; तिथे आपली छाप सोडली. तिने मराठी रंगभूमीवर काम केले; तिथेही तिने आपली छाप सोडली.(Shapit Gandharva) नुसती छापच सोडली असे नाही, तर रंगभूमीवर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. ती अल्पावधीतच अस्सल नाट्यरसिकांच्या गळ्यातला ताईत झाली होती. तिने अतिशय कमी कालावधीतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली होती.ती म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी ‘फुलराणी’ उर्फ ‘भक्ती बर्वे- इनामदार’.

 

तिचे सर्व काही चांगले चालले होते. कारकीर्द जोरात होती, जिवापाड प्रेम करणारा आणि तिला समजून घेणारा साताजन्माचा जोडीदारही लाभला होता. सगळे सत्यच पण कसे स्वप्नवत! अन् या सत्यालाच नजर लागली. काही वर्षे आधी नवरा अचानकपणे जगातून कायमस्वरूपी निघून गेला. त्या धक्क्याने ही ‘फुलराणी’ कोसळली. पुन्हा सावरली अन् त्यातून बाहेर येण्यासाठी तिने स्वतःला कामात पूर्ण झोकून दिलं. इतकं की त्यात तिला दिवस कळेना, रात्र दिसेना. याच व्यापात गुंतलेली ती एके दिवशी भल्या पहाटे आपल्या नाटकाचा शो करून घरी परतत असताना एका रस्ते अपघातात जागीच मृत्यूमुखी पडली. तिच्या आकस्मिक अपघाती मृत्यूने अभिनयाच्या अस्सल रसिकांना प्रचंड दुःख झाले, मराठी, हिंदी नाट्य चळवळीची, चित्रपटसृष्टीची अपरिमित हानी झाली.

सांगली येथील कृष्णराव बर्वे यांची भक्ती ही कन्या.10 सप्टेंबर 1948 रोजी भक्तीचा जन्म झाला. तिला अलका नावाची एक बहीण तर सुरेश नावाचा एक भाऊही होता. सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे हे भक्तीचे चुलत भाऊ. तिचे बालपण अतिशय चांगल्या पद्धतीने क्रमित झाले. भक्तीला अभिनयाची प्रचंड आवड होती आणि तिला परमेश्वर कृपेने त्याची उपजतच जाणही होती. नशीब जोरावर असले की संधीचे दार आपोआप उघडतेच. तसेच तिच्याबाबतही झाले. तिने सर्वप्रथम आकाशवाणीवर अन् नंतर दूरदर्शनवर ‘वृत्तनिवेदिका’ म्हणून काम करायला सुरुवात केली. इथे तिच्यासोबत तेव्हा सुप्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका स्व. स्मिता तळवलकरही काम करत होत्या.

E- Bike : ई-बाईक बनविणा-या विद्यार्थ्यांचे शंकर जगताप यांच्याकडून कौतुक

 

‘महाराष्ट्राचे शेक्सपिअर’ म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल.देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’ या नाटकात भक्तीला मुख्य भूमिका मिळाली आणि तिने ती इतकी अजरामर केली की भक्ती म्हणजे फुलराणी आणि फुलराणी म्हणजे भक्ती, हे समीकरणच झाले. मुळातच भक्ती अतिशय चतुरस्त्र अभिनेत्री होती. त्यात या भूमिकेत तिने इतका जीव ओतला की ही भूमिका अक्षरशः अजरामर झाली. या नाटकाने 1100 च्या वर प्रयोग करून एक नवा विक्रमच प्रस्थापित केला. त्यानंतर भक्तीला आणखी एक अप्रतिम भूमिका मिळाली. ‘आई रिटायर होतेय’ या नाटकातली. याचेही तिने सोने केले. या नाटकानेही सुमारे हजाराच्या जवळपास प्रयोग केले (950शो)आणि भक्तीचे नाव खऱ्या अर्थाने नाट्यरसिकांच्या हृदयात अजरामर झाले. याच दरम्यान तिने सुप्रसिद्ध अभिनेता शफी इनामदारसोबत विवाह केला.

 

नाटकातल्या यशासोबतच तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही काम करायला सुरुवात केली. जाने भी दो यारों, हजार चौरासी की माँ, बहिणाबाई अशा काही मोजक्याच पण हटके चित्रपटांत काम करून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. याच दरम्यान तिची रंगभूमीवरची कारकीर्द एकदम बहरली. तिने ‘अखेरचा सवाल’, ‘अल्लाउद्दीन व जादूचा दिवा’ (बालनाट्य), ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘आई रिटायर होतेय’ (मराठी आणि गुजरातीत-बा रिटायर थाय छे), ‘आधे अधुरे’ (हिंदी आणि मराठी), ‘आले देवाजीच्या मना’ , ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’ (बालनाट्य), ‘गांधी आणि आंबेडकर’, ‘घरकुल’, ‘चिनी बदाम’ (बालनाट्य), ‘जादूची वेल’ (बालनाट्य), ‘टिळक आणि आगरकर’, ‘दंबद्वीपचा मुकाबला’, ‘पपा सांगा कुणाचे’, ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’, ‘पुरुष’, ‘पुलं, फुलराणी आणि मी’, बाई-खुळाबाई’, ‘बूटपोलिश’, ‘माणसाला डंख मातीचा’, ‘मिठीतून मुठीत’, ‘रंग माझा वेगळा’ , ‘रातराणी’ (मराठी, हिंदी आणि गुजराती), ‘वयं मोठं खोटम्’ (बालनाट्य), ‘शॉर्टकट’, ‘सखी प्रिय सखी’, ‘हॅंड्स अप’ आदी नाटकांत काम केले.

 

मात्र या कामाच्या व्यापामुळे तिची दगदगही वाढली होती. त्यातच तिचा लाडका शफीही तिला सोडून अल्लाकडे निघून गेला होता. त्या धक्क्यातून सावरण्यासाठी तिने स्वतःला कामात आकंठ बुडवून टाकले होते. आणि अखेर तो काळदिवस उगवला. 12 फेब्रुवारी 2001. याच दिवशी ती आपल्या ‘आई रिटायर होतेय’ या नाटकाचा शो संपल्यावर पुण्याला परतत असताना पनवेलजवळ असलेल्या भतान बोगद्याजवळपास तिच्या गाडीला भयंकर अपघात झाला आणि त्यात ही फुलराणी जागीच कायमस्वरूपी कोमेजली. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी रंगभूमीला पोरके करून ती परमेश्वराकडे आणि आपल्या लाडक्या शफीकडे निघून गेली.

 

भक्तीच्या त्या अपघाताबद्दल त्यावेळी अनेकांनी हळहळ व्यक्त केली. तिने इतक्या रात्री प्रवास करणे टाळायला हवे होते असेही म्हटले गेले. पण मृत्यू येणार असला की तो कुठेही गाठतो, मग तुम्ही कुठेही असा, हेच खरे. महाराष्ट्र सरकारने त्या बोगद्याला श्रद्धांजली म्हणून तिचे नाव दिले आहे.एक नक्की. काळ सर्व जखमांवरचे मोठे औषध आहे.  रंगभूमी असे क्षेत्र आहे , जे कोणासाठीही कधीही थांबत नाही, थांबणारही नाही. पण तरीही हेच खरे की भक्तीच्या अकाली जाण्याने मराठी रंगभूमीचे आणि चित्रपटसृष्टीचेही अपरिमित नुकसान झाले. मृत्यू कितीही शाश्वत सत्य असले, तरीही तिचे जाणे आजही मनाला पटत नाही आणि पचत तर त्याहूनही नाही. पण हाच तर दैवी संयोग असतो, ज्याच्या पुढे प्रत्येक जण हतबल असतो. नाही का?

 

फुलराणीच्या पावन आत्म्याला सद्गती लाभो, हीच परमेश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना!

– विवेक कुलकर्णी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.