Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 1 – ‘दोस्ती’ फेम सुशीलकुमार – सुधीरकुमार

एमपीसी न्यूज  (विवेक कुलकर्णी) – साधारण 56 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. अर्थात ही एक गोष्ट नसून एक सत्यकथाच आहे.(Shapit Gandharva) भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीचे तीन महानायक म्हणजेच प्रणयी चित्रांचा बादशाह देव आनंद, ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार आणि ग्रेट शोमन राज कपूर आपापल्या कौशल्यांनी आपापल्या चाहत्यांना खूश करत असतानाच राजश्री प्रॉडक्शनच्या निर्मितीद्वारे सन 1966 साली आलेल्या  ‘दोस्ती’ नामक चित्रपटाने रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होताच अवघ्या काहीच आठवड्यात रसिकांना एकदम वेडावून सोडले. त्याकाळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाल करत कमाईचे अनेक विक्रम नोंदवले होते.

Shapit Gandharva

लक्ष्मी-प्यारेचे कर्णमधुर संगीत,रफीसाहेबांचा स्वर्गीय जादुई सूर,ताराचंद बडजात्या साहेबांचे अप्रतिम दिग्दर्शन आणि नवख्या सुशीलकुमार ,सुधीरकुमार या जोडीचा अद्भूत आणि मनाला भावणारा अभिनय या सर्वांची भट्टी अचूक जुळून आल्याने या चित्रपटाने त्या काळी सर्वत्र एकच धुमाकूळ उडवून दिला होता. आजच्या भाषेत हवा केली होती.

एक अंध, तर दुसरा अपंग असलेल्या पण साधारणपणे सारखीच परिस्थिती असल्याने अल्पावधीतच जिवलग मित्र झालेल्या रामू (सुशीलकुमार) आणि मोहन (सुधीरकुमार) या मित्रांची अतूट मैत्री, त्यांचे कष्ट आणि त्यांचा मधुर आवाज – या साधारणतः अशा पद्धतीच्या कथानकाने बघता-बघता रसिकांना भुरळ पाडली आणि हा चित्रपट अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाला.

TVS Motors : टीव्हीएस मोटर कंपनीने फॉर्म्युला 1 ड्रायव्हर नारायण कार्तिकेयन यांच्या “ड्राईव्ह एक्स” स्टार्ट-अप मध्ये केली गुंतवणुकीची घोषणा

साहजिकच या चित्रपटातल्या कलाकारांचीही सर्वत्र चर्चा व्हायला लागली. त्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून आपल्या अभिनयकौशल्याने टीकाकार, समीक्षक आणि मायबाप चाहते या सर्वांनाच आपल्या प्रेमात पाडले. एवढेच नाही तर त्यांनी फक्त एकाच चित्रपटातून मिळवलेल्या यशाने त्याकाळच्या तिन्ही सुपरस्टारच्या सिंहासनाला जणू हादरे देत आपल्या आगमनाची वर्दीही दिली.

त्याकाळी आजच्या इतका मीडिया सुसाट नसला तरी त्याकाळच्या प्रत्येक बातमीपत्रात ,सिनेपटावर येत असलेल्या यच्चयावत वृत्तपत्रात,मासिकात, पाक्षिकात फक्त या जोडीनेच आपले नाव लाईमलाईटमध्ये ठेवले होते. तिन्हीही सुपरस्टार यांच्या या पदार्पणातील देदीप्यमान यशामुळे खूप अस्वस्थ झाले आहेत, अशा अफवाही त्याकाळी थैमान घालत होत्या.

आणि त्यानंतर पुढील कित्येक वर्षात या जोडीचा एकही चित्रपट न आल्याने यांचा खून झाला आहे आणि तोही दिलीपकुमार यांनी केला आहे,(Shapit Gandharva) अशी एक खूपच सनसनाटी अफवा सुद्धा त्या काळी वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. असे खरेच झाले होते का? कोण होते हे सुधीरकुमार आणि सुशीलकुमार? आणि जर ते खरोखरच जिवंत होते, तर मग त्यांचे पुढे काय झाले? असे असंख्य प्रश्न तुम्हालाही सतावू लागलेत ना? माझ्यासारखेच?

माझ्या या नव्या लेखमालेचे जे शीर्षक आहे, ते ज्यांच्यावर अगदी चपलख लागू होते, ते शापित गंधर्व म्हणजेच या पहिल्या लेखमालेतले प्रथम मानकरी असलेली दोन नावे म्हणजेच आपल्या धूमकेतूटाईप पदार्पणाने सर्वांना आपलेसे करणारे; पण या अफाट यशाला पुन्हा कधीही न प्राप्त करू शकलेले दोन शापित गंधर्व म्हणजेच सुशीलकुमार आणि सुधीरकुमार.

परमेश्वराची लीला म्हणजे नक्की काय असते, ती कशी असते अन् ती कुणाला कळते, या प्रश्नाचे उत्तर आजतागायत कोणालाही देता आले नाही, नाही का? कधी कधी तो एखाद्या क्षणी आपल्याही नकळत असा काही प्रसन्न होतो, की काही विचारूच नका. रंकाचा राव करतो, जगभरातले इतरांना अप्राप्य असणारे स्वर्गीय सुख आपल्या पायाशी आणतो,असेच नव्हे तर त्या सुखाला आपले दास बनवतो.

आधी आपल्याला यावर विश्वासच नसतो; पण हे सत्य आहे, याची जेव्हा आपल्याला जाणीव होते, त्या क्षणी आपल्यालाच आपला हेवा वाटायला लागतो. त्यातून पुढे जात असताना कळत नकळत एक अहंपणाची आपल्यात पेरणी होते. कितीही नाही म्हटले तरी एक माज आपल्यात घुसतो आणि जगात सर्वात मोठे कोण असेल तर ते आपण, असे वाटायला लागत असतानाच तो वर आपल्याकडे बघत असताना (Shapit Gandharva) हे सर्व पाहून मनातल्या मनात छद्मी हास्य करतो आणि लगेचच एका चुटकीसरशी आपल्या साऱ्या माजाला जिरवत आपल्याला खाडकन एखाद्या सुंदर स्वप्नातून जागे करतो आणि हम कुछ भी नही है, याची जबरदस्त अनुभूती देत आपल्या मर्जीचे खतरनाक प्रत्यंतर देतो. अगदी असेच काही या जोडीबाबत झाले होते असे म्हणता येणार नसले, तरी बऱ्यापैकी असेच काहीसे यांच्याबाबत नक्कीच घडले होते.

कुठल्याही गॉडफादर (पक्षी वशिला) विना ही जोडी आपल्या पहिल्याच चित्रपटातल्या घवघवीत यशाने सर्वाच्या गळ्यातील ताईत झाली होती. जिकडे-तिकडे त्यांचीच चर्चा चालू असताना मात्र या चित्रपटानंतर त्यांना एकदाही पुन्हा तसा यशाची चव चाखवणारा चित्रपट वा इतिहास घडवता आला नाही, हे अतिशय कटू असे वास्तव आहे, हे नाईलाजाने का होईना पण मान्य करावेच लागते. असे का झाले असेल यांच्याबाबत, या प्रश्नाचे उत्तर फक्त तो परमेश्वरच देवू शकतो, नाही का?

आपल्या बालपणी आपण नेहमीच पोथी-पुराणात गंधर्व कथा ऐकलेल्या आहेत, देवदेवतांच्या गळ्यातले ताईत असणारे गंधर्व कधी-कधी आपल्या अहंपणामुळे ऋषी-मुनींच्या शापाला बळी पडतात, मग त्यांना काही कालावधीसाठी पृथ्वीतलावर मर्त्यरूपात अवतार घ्यावा लागतो,(Shapith Gandharva) त्या शापाचा कालावधी संपत येताच त्यांच्या हातून एखादे अलौकिक कार्य घडते आणि त्यांची शापातून सुटका होते आणि त्यांना पुन्हा तो गंधर्व लोक प्राप्त होतो, अशा पद्धतीच्या त्या कथा असत.या कथा खऱ्या असाव्यात असे आपल्याला तेव्हा वाटते,जेव्हा केव्हा आपल्याला अशा उदाहरणाची प्रचिती येते.

या जोडीतला सुधीरकुमार सावंत हा आपला मराठी नट होता, तर सुशीलकुमार बेलानी हा पाकिस्तानी होता. केवळ कर्म-धर्मसंयोगाने राजश्री प्रोडक्शनचा दोस्ती हा चित्रपट त्यांना मिळाला आणि त्यांनी या आकस्मिकपणे आलेल्या संधीचे सोने करत आपल्या नावाची दखल समस्त सिनेसृष्टीला घ्यायला लावली, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.

दैवी अभिनयशक्ती असूनही या जोडगोळीला पुन्हा तसा चित्रपट मिळाला नाही. यातल्या सुशीलकुमारने काही तमिळ, तेलगू(दाक्षिणात्य) चित्रपटांत आपले नशीब आजमावले; मात्र त्याला त्यातही फारसे यश न मिळाल्याने तो आपल्या वाड-वडिलांच्या व्यवसायात उतरला आणि त्याने आपले उर्वरित आयुष्य एका सामान्य माणसाप्रमाणे घालवले.

सुशीलकुमारचा जन्म 4 जून 1945 साली कराची येथे झाला होता. त्याच्या घरची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली होती. मात्र 1947 च्या फाळणीनंतर त्याचे कुटुंब गुजरातमध्ये स्थलांतरित झाले. याच दरम्यान त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने त्याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अस्थिर झाल्याने त्याने बालकलाकार म्हणून काम केले.

त्यानंतर त्याने धूल का फूल, कालाबाजार, दिल भी तेरा हम भी तेरे अशा काही चित्रपटांतही काम केले. पण त्याला खरे नाव मिळवून दिले ते त्यानंतर आलेल्या ‘दोस्ती’ या चित्रपटाने. मात्र त्यानंतर देवाची अवकृपा झाली अन त्याला म्हणावे तसे काम मिळाले नाही.(Shapith Gandharva) अखेर त्याने शिक्षण पूर्ण करून 1971साली एअर इंडियामध्ये नोकरी मिळवली आणि त्याच दरम्यान तो हळूहळू चित्रपटसृष्टीबाहेर पडला.

निवृत्तीनंतर तो चेंबूर येथील आपल्या घरीच राहू लागला , तर यातला त्याचा मित्र असणाऱ्या सुधीरकुमार सावंतने या चित्रपटानंतर काही मराठी चित्रपटांत काम करून आपल्याला पुन्हा तसे यश मिळेल का हे पाहिले. जानकी,अन्नपूर्णा हे त्याचे   चित्रपट होते. पण त्यातही फारसे यश न मिळाल्याने त्याचीही उर्वरित कारकीर्द अडखळत चालली आणि हळूहळू तो ही चित्रपटसृष्टीतून बाहेर पडत गेला.1993 साली मुंबई येथे त्याचे कर्करोगाच्या दुर्धर आजाराने निधन झाले.

दुर्दैवाने आपले नाव एका चित्रपटाने अजरामर करणाऱ्या या कलाकाराच्या मृत्यूची फारशी कोणाला माहिती नव्हती. त्याच्या धाकट्या बहिणीने एका प्रेसनोटद्वारे त्याच्या मृत्यूची बातमी जगाला दिली.(Shapith Gandharva)अशा रीतीने पदार्पणातच मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती या दोघांनाही दुर्दैवाने करता न आल्याने हे यक्षनगरीचे गंधर्व पुढील अनेक पिढ्यांसाठी एक दंतकथाच बनून राहिले. हे दुर्दैवाने कटू आहे पण सत्यही आहे.

– विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.