Bhosari News: एसटी ही महाराष्ट्राची ओळख; खासगीकरण होणार नाही – अनिल परब

एमपीसी न्यूज – एसटी ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी एसटीचे खासगीकरण होणार नाही, असे सांगत एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या खासगीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

दरम्यान, एसटीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार थकणार नाही. या अडचणीतून बाहेर येण्यासाठी शासनाने एसटीला 600 कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे वेतानासारख्या अत्यावश्यक गोष्टीना आता अडचण येणार नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले.

वाकडेवाडी येथील एसटी स्थानक आणि दापोडी येथील एसटीच्या कार्यशाळेला भेट दिल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भोसरी येथील सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी ) येथे भेट दिली. या ठिकाणी परब यांनी एसटीच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत एसटीच्या उत्पन्न वाढी संदर्भातील विविध पर्याया संदर्भात चर्चा केली.

कोरोना काळात एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. एसटीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे, उत्पन्नाचे स्रोत वाढविणे, मार्गांचे सुसूत्रीकरण करणे, काही गाड्यांच्या फेऱ्यांचे एकत्रीकरण करणे, अशा काही उपाययोजना करून एसटीच्या उत्पन्न वाढीचे प्रयन्त सुरू असल्याचे सांगत  मंत्री परब म्हणाले,  कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांत एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काही काळ तर एसटीचे उत्पन्न एकदम शून्यावर आले होते. अजूनही एसटीची सेवा पूर्णपणे चालू होण्यासाठी दोन ते तीन महिने लागू शकतात. या काळात एसटीचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहे. एसटीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढ कशी करता येईल, याकडे लक्ष दिले जात आहे.  एसटीचा खर्च कमी करण्यासाठी एसटीच्या मार्गांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच काही फेऱ्यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे, असे परब यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.